पैशाचे प्रश्न सुटतील..?

Swapna Mirashi

पूर्वीच्या चित्रपटांमध्ये खास करून मराठी चित्रपटांमध्ये एक शॉट अगदी कॉमन असायचा. एक तारखेला नायक पगार झाला म्हणून हौसेनं बायकोसाठी गजरा, मुलांसाठी खाऊ आणायचा. आईचा किंवा बाबांचा चष्मा तुटलेला असेल तरव तो दुरुस्त करून आणायचा किंवा नवीन चष्मा आणून त्यांना सुखद धक्का द्यायचा. दादानं काहीच नाही आणलं म्हणून रुसलेल्या भावाला किंवा बहिणीला मग पुढच्या महिन्याच्या एक तारखेचं वचन दिलं जायचं.

महिनाभराची चंगळ ही एवढय़ावर संपायची. पुढे महिनाभर फक्त गरजेसाठी खर्च.

चित्रपटातला तो एकच सीन पण कोणतंही मध्यमवर्गीय कुटुंब कसं चालतं हे सांगण्यासाठी पुरेसा असायचा.

चित्रपटात हे होतं आणि प्रत्यक्ष घरात नव्हतं असं नाही. मुळात ते प्रत्यक्षात होतं म्हणून तर चित्रपटात होतं ना!

पूर्वी बाईनं काटकसरीनं घर चालवलं की तिचं चारचौघांत कौतुक व्हायचं. पूर्वी काटकसर करणार्‍या याच बायका आज उधळमाणकेपणा करणार्‍या आपल्या लेकी-सुनांचे चारचौघांत कान उपटतात.  ‘आमच्या काळात नव्हतं बरं असं’ असा डायलॉगही येता जाता म्हणतात. ऐकणार्‍याला तो टोमणाच वाटतो. पण या पिकलेल्या खोडांच्या बोलण्यातला गाभा आजच्या लेकी-सुनांना कळत नाही हेच दुर्दैव. पण कळेल तरी कसं?

आज बाजारात नव्हे मॉलमध्ये गेल्यावर पाच किलोच्या धुण्याच्या पावडरवर एक चांगल्या दर्जाचा पोछा, घासणी आणि एक साबण एवढ्ढं सारं फ्री मिळत असेल तर घरात एक किलो पावडरची गरज असतानाही पाच किलो पावडर येणारंच.

तीन कुर्त्यांवर एक कुर्ता फ्री असं आकर्षक लेबल लावलेलं असेल तर गरज नसतानाही चार चार कुर्ते घरात येणारंच!

घरी आई-बाबांच्या वारेमाप खरेदीकडे बघून मुलांच्याही डिमांड वाढतात आणि आज  ‘माझ्याकडचे पैसे संपले पुढच्या महिन्यात बघू’ हे सांगून मुलांचे हट्ट टोलावण्याची सोय ना बाजारानं ठेवली ना बँकेनं.

खिशात पैसे नसतानाही पन्नास हजारांची वस्तू खरेदी करता येते. त्यामुळे खर्च किती झाले? उरले किती? यादीतल्या प्रमाणे खरेदी होते आहे का? याचा ताळमेळ लावण्याची गरजच पडत नाही.

आज पैसा खर्च करणं इतकं सहज असताना चाकं लागलेल्या खर्चाला आळा घालायचा कसा? विचार केला तरी गोंधळायला होतं.

आपल्या पैशांना आज इतक्या वाटा फुटल्या आहेत की पैसा वाचवायचा कसा? तो गुंतवायचा कसा? हेच कळत नाहीये. आज बाजारात गेल्यावर विविध ब्रॅण्डसच्या वस्तू जशा डोकं चक्रावून टाकतात तशा आकर्षक फायद्याच्या विविध कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या जाहिरातीही भंडावून सोडतात.

आज कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबातल्या बाईची अवस्था अशीच गोंधळलेली. तिला घर चालवायचय, हौसामौजा पुरवायच्याय आणि उद्याचाही विचार करायचाय पण आज ना तिला तिच्या गरजा ठरवता येताय ना अनावश्यक खर्चाला आळा घालता येतोय.

पै-पैसा जपला, जपून वापरला, योग्य जागी गुंतवला तरचं वाढतो नाहीतर घरात कितीही आणि कितीही जणांनी कमवा पण तो पुरत नाहीच हे तिलाही कळतंय पण करायचं काय? हा प्रश्न तिला पावलोपावली पडतोय.

म्हणूनच  ‘सखी’च्या अंकात आजपासून  ‘पै-पैसा’हे सदर सुरू करतो आहोत. कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबाच्या खर्चाला, बचतीला अन् गुंतवणुकीला हवी असणारी पण न सुचणारी दिशा हे सदर नक्कीच दाखवू शकेल.

 

(Published in Lokmat Sakhi)

Comments