पै-पैसा

Swapna Mirashi

एक साताठ वर्षांची मुलगी. आईबरोबर नेहमीच खरेदीला जाणारी. आईला कॅश हवी असली, की ती एटीएममध्ये जाऊन पैसे काढते हे त्या मुलीनं अनेकदा पाहिलेलं.

तिच्यासाठी सोप्पाच होता सगळा व्यवहार. मशीनमध्ये कार्ड घातलं, काही बटणं दाबली, की पैसे बाहेर !

आणि आई तशी जागरूक. जे हवं ते लग्गेच विकत घेता येतं, असा चुकीचा संस्कार मुलीच्या मनावर होऊ नये म्हणून जागरूक असणारी.

एकदा ती मुलीला म्हणाली,  ‘‘हे आत्ता नको हं घेऊया. पैसे संपले आता माझ्याकडचे.’’

मुलगी गोंधळून म्हणाली, ‘‘अगं, पैसे कसे संपतील? आपण एटीएममधून काढूया ना. तू नेहमीच तर काढतेस!’’

– पैसे मशीनमधून येतात, किंवा क्रेडिट कार्डनामक जादू आपल्याकडे असेल, तर पैशांशिवाय खरेदी करता येते, या अनुभवात वाढलेली ही मुलगी प्रत्येक जागरूक पालकापुढे काय वाढून ठेवलेलं आहे, याचं एक उदाहरणच!

पैसा म्हणजे केवळ वस्तूच्या किमतीच्या लेबलवर डकवलेला  ‘आकडा’ वाटावा, असा हा काळ. खरेदी-विक्री, बॅँकिंगपासून अगदी गुंतवणुकीपर्यंतचे सारे आर्थिक व्यवहार ऑनलाइन होऊ लागल्यानं आपण सारेच  ‘कॅॅशलेस’ अनुभवात जगू लागलो आहोत.

पूर्वी आई-बाबा दर महिन्याला खाऊसाठी, शाई-पेनसाठी मोजके पैसे मुलांच्या हातावर टेकवत. त्यातले निम्मे पैसे गल्ल्यात साठवले पाहिजेत, असा आग्रही संस्कार असे. मुलांनाही विकत घेतलेल्या वस्तूपेक्षा गल्ल्यातल्या पैशांचा खुळखुळाट जास्त आनंददायी वाटायचा. खरं तर आपण सर्वच या संस्कारात वाढलो.

पण बचतीचे, जपून खर्च करण्याचे आपल्यावर झालेले संस्कार आपणच विसरावेत, अशी परिस्थिती आली असताना, मुलांना काय आणि कोण सांगणार?

पैसे आई-बाबा कमावतात, त्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात ही जाणीव मुलांच्या मनात रुजण्यापूर्वीच   ‘पैसे काय एटीएममधूनच तर येतात’ हा संस्कार ठसतो आहे.

याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेलं आर्थिक पर्यावरण. आज आपण अतिशय प्रगत अशा अर्थव्यवस्थेत जगतो आहोत. खिशात पैसे नसले तरी आपण मनसोक्त खरेदी करू शकतो हे बदललेल्या अर्थव्यवस्थेचेच तर परिणाम आहेत. या बदललेल्या अर्थव्यवस्थेमुळेच आज पैसा सहज उपलब्ध होतो आहे. तसेच खर्च करण्याच्या अनेक आकर्षक शक्यता आज बाजारात आहेत.

अर्थव्यवस्था बदलली की लोकांच्या जगण्याच्या पद्धतीही बदलतात. पूर्वी कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबाला महिना अखेर आली की पैशाची जुळवाजुळव करावी लागायची. उरलेल्या पैशांचा अंदाज घेऊन वेळी स्वत:च्या इच्छांना आणि गरजांना मुरडही घालावी लागायची. त्यामुळे पैसा खर्च करताना प्रत्येकजण तो जबाबदारीनंच खर्च करायचा.

ही जबाबदारी माणसांमध्ये निर्माण करण्यात त्याकाळची अर्थव्यवस्था, बॅँका आणि बाजारव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची मोठी भूमिका होती.

खरेदी दुकानात जाऊन रोखीनं करायची गोष्ट होती. ‘उधारी बंद’, ‘आज नकद कल उधार’यासारख्या पाट्या सर्वत्र असत. उधारीची सोय ना दुकानदार देत  ना ती सवलत घेण्याचे संस्कार कुटुंबात होते. कोणतीही गोष्ट उधारीवर घ्यायची नाही हा प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबांचा नियमच होता.

शिवाय मनात आलं म्हणून सहज बाजारात चक्कर मारून गंमत म्हणून खरेदी करणं अवघडच होतं. दुकानं बारा-बारा तास उघडी नसायची. बाजारात वस्तूंचे भरमसाठ ब्रॅण्डसही नव्हते. त्यामुळे गरजेपेक्षा खरेदी करण्याला संधी, शक्यता कमीच होत्या.

पूर्वी बॅँकांमधून रोख रक्कम काढण्यावर र्मयादा होत्या.  कर्ज सहजासहजी मिळत नसत. अंथरुण पाहून पाय पसरण्याला प्रतिष्ठा होती.

मिळकत किती का असेना पण अल्पबचतीचे संस्कार रुजवण्यात सरकारच्या विविध योजनांचा पुढाकार होता.

आजसोबत उद्याचा विचार करण्याची आणि तशी तरतूद करण्याची सवय भविष्यनिर्वाह निधीचे पैसे कापून लावण्याची सोय होती. गुंतवणूक केल्यास करसवलतीचं आमिष होतं.

मिळणार्‍या पैशावर असा चारी दिशांनी वचक असल्यानं पैसे खर्च करताना पूर्वी माणसं जबाबदारीनं संयमानं वागायची. एकूणच  ‘पर्सनल फायनान्स’ हा विषय खरं तर बराचसा सार्वजनिकच होता.

बदलत्या अर्थव्यवस्थेनं हे चित्र झपाट्यानं बदलवलं. मध्यमवर्गाला मोठय़ा पगाराच्या संधी मिळाल्या. गरजेपेक्षा जास्तीचा पैसा हाती येऊ लागला.

 

बाजारपेठ गजबजली

 

सहजी मिळणारी कर्ज, क्रेडिट कार्ड घ्या म्हणून ससेमिरा लावणर्‍या बॅँका, रोख रक्कम कधीही कुठेही आणि कितीदाही काढण्याची सोय करणारी एटीएम मशिन्स. चोवीस तास उघडे असणारे आकर्षक मॉल्स आणि कोणत्याही क्षणी कोणतीही वस्तू खरेदी करण्याची सुविधा..

पैसा मिळवण्याच्या पैसा खर्च करण्याच्या खूप सार्‍या शक्यता आपल्या अवती-भवती अचानकच उगवल्या.

परिस्थितीनुसार पिढी बदलते. प्रत्येक पिढीला त्या परिस्थितीचे फायदे मिळतात आणि तोटेही सहन करावे लागतात. परिस्थितीनुसार जशा नाना संधी उपलब्ध असतात तशी आव्हानंही असतात. पूर्वी हातात काही ‘नसण्याचं’ आव्हान भारतीय मध्यमवर्गापुढे होतं. आता हातात ‘जरुरीपेक्षा जास्त असण्याचं’ आव्हान आहे.

हातात आर्थिक स्वातंत्र्य असलेल्या पिढीपुढे जसे आज मिळकतीचे खर्चाचे अनेक पर्याय आहेत तसेच गुंतवणुकीचेही आहेत. आज पैसा खर्च करताना जसा गोंधळ उडतो आहे तसाच गोंधळ गुंतवणूक करतानाही होतो आहे.

समजतच नाही, की पैसा कुठे, किती आणि कसा गुंतवावा ! तुम्ही व्यावसायिक असा, डॉक्टर, शिक्षक, पालक वा गृहिणी कुणीही असा आपल्या हातातल्या पैशाचं व्यवस्थापन कसं करावं? हे आता ज्याला-त्याला ठरवावं लागतं आहे.

पैशाच्या नियोजनाचं महत्त्व लक्षात घेऊन ते जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आजच्या स्मार्ट साधनांनी वेळेआधीच स्मार्ट झालेल्या आपल्या मुलांनाही पैशांचं महत्त्वं योग्य वेळेत कळेल. पैशाकडे कसं बघावं? पैसा कसा हाताळावा? पैशाच्या व्यवस्थापनाचं कौशल्य अंगी कसं बाणवावं?  हे प्रश्न कोणी विचारले तर ते आपल्याला  अवघडच वाटतील. पण कोणी हेच प्रश्न सोप्या भाषेत सोडवले-समजावून सांगितले तर..! सहज झालेल्या पैशाची अवघड वाटणारी उत्तरं सोप्या भाषेत सांगण्यासाठी  ही लेखमालिका आजपासून दर आठवड्याला.

Comments