तुमच्या पैशाचं ‘कॅलेंडर’!

Swapna Mirashi

आज सर्वात आधी एक अशोक नावाच्या तरुणाचं उदाहरण सांगते. अशोकनं आपली बाइक रस्त्यावर पार्क केली होती. या बाइकला एका टॅँकरनं जोरदार धडक दिली. त्यात गाडीचं मोठं नुकसान झालं. बाइकच्या दुरुस्तीसाठी बराच खर्च येणार होता. अशोकला वाटलं, आपण बाइकचा विमा काढलाय. सरळ विमा कंपनीकडे जाऊ अन् भरपाई मिळवू, म्हणजे अचानक अंगावर आलेल्या या खर्चाचा ताण कमी होईल. अशोकनं ही बाइक तीन वर्षापूर्वीच विकत घेतली होती; पण नंतर नोकरीत व्यस्त झाल्यानं गाडीच्या पॉलिसीची कागदपत्रं नेमकी कुठे ठेवली? हेच अशोकला आठवेनासं झालं. आठवडय़ाभरानंतर त्यानं आपली संपूर्ण खोली धुंडाळून विम्याची कागदपत्रं शोधून काढली, पण त्याच्या या मेहनतीचा काहीच उपयोग झाला नाही. कारण विम्याचे हफ्ते वेळेत न भरल्यानं पॉलिसीच संपुष्टात आली होती.

पाहिलंत एका साध्या बाबीकडे दुर्लक्ष केल्यानं अशोकला महिन्याच्या निम्म्या पगाराइतका भरुदड सहन करावा लागला.

म्हणून सांगते, तुम्हाला तुमचा पैसा अन् वेळही वाचवायचा असेल, भविष्यासाठी आर्थिक नियोजन करायचं असेल, तर ‘रेकॉर्ड किपिंग’ हा त्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

‘रेकॉर्ड किपिंग’ का..? कशासाठी..?

अनेकदा साध्या-साध्या प्रसंगांत गरज नसताना आपल्याला जादा पैसे आणि वेळ खर्च करावा लागतो. मात्र काही अगदी लहानसहान टिप्स, योग्य नियोजन, वेळच्या वेळी व्यवहारांची नोंद या बाबी आपला आर्थिक आणि मानसिक ताण मोठय़ा प्रमाणात हलका करू शकतात. यालाच म्हणतात, ‘रेकॉर्ड किपिंग. वेळच्या वेळी आणि अचूक रेकॉर्ड ठेवलं तर फायदा आपलाच होणार आहे.

 

रेकॉर्ड ठेवल्यास..

 

’ तुम्ही तुमच्या पैशांवर व्यवस्थित लक्ष ठेवू शकता. तुमचे उत्पन्न नेमकं कोठून येतं? खर्च कशा-कशावर होतो हे कळू शकतं.

’ तुम्हाला तुमचं उत्पन्न वा मालमत्तेबाबत जसं बचत, गुंतवणूक, विमा आणि देण्यांबाबत म्हणजे क्रेडिट कार्ड, गृह अथवा वाहनकर्ज वेळच्या वेळी आणि अचूक माहिती मिळू शकते.

’ तुमच्या आर्थिक व्यवहारांचं सुयोग्यरीत्या नियोजन करू  शकता. उदा : फॅमिलीचं बजेट , बचत, गुंतवणूक, कर भरणं यांचं व्यवस्थित नियोजन करता येतं.

’ तुम्ही केलेल्या आर्थिक व्यवहारांचा पुरावा तुमच्याकडे उपलब्ध राहू शकतो. उदा : बॅँकेत पैसे भरले, मालमत्तेची खरेदी केली तर त्याचा पुरावा जपून ठेवणं केव्हाही चांगलं. मालमत्तेच्या बाबतीत ब:याचदा तंटे उद्भवू शकतात. समजा एखाद्या व्यवहाराबाबत समोरच्या व्यक्तीशी मतभेद वा वादविवाद उद्भवल्यास तुम्ही व्यवस्थित जपलेल्या पुराव्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

’विम्याची कागदपत्रं काळजीपूर्वक ठेवल्यास आपत्कालीन स्थितीत विमा कंपनीकडे दावा करणं सोपं जातं. याशिवाय विकत घेतलेल्या एखाद्या वस्तूचं वॉरंटी कार्ड जपून ठेवलेलं असेल, तर ती वस्तू खराब झाल्यास दुकानदाराकडे तुम्ही हक्कानं भरपाई वा मोफत दुरुस्तीचा दावा करू शकता.

’ एखादी वस्तू तुम्हीच खरेदी केली होती, याचा पुरावा कागदपत्रंच्या आधारे देऊ शकता. विशेषत: विक्रीनंतरची सेवा मिळवण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते.

’ तुमच्याकडे व्यवहारांच्या व अन्य नोंदी व्यवस्थित असतील, तर त्यांच्या आधारे तुम्ही भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी एखाद्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता.

Comments