बचत.. एक लहानसा आणि नेहमी कानावर पडणारा शब्द..
पण हा एवढासा शब्द किती ताकदीचा आहे, हे माहीत आहे का तुम्हाला?
असेलही आणि नसेलही कदाचित.
आणि जर नसेल तर ही बचतीची ताकद प्रत्यक्ष अनुभवून बघायलाच हवी.
बचतीबद्दल आपण गेल्या दोन आठवड्यांपासून बरंच बोललोय. पण ते सर्व वाचून झाल्यावर आपण बचतीला तयार झालात का? हा माझा आजचा प्रश्न.
बचत म्हणजे काय ती कशासाठी करायची हे जरं नीट समजून घेतलं तर आज आणि आत्ताही आपल्याला बचतीला शुभारंभ करायचा असल्यास कोणतीच अडचण येणार नाही.
बचत म्हणजे भविष्यातील उपयोगासाठी काही पैसे बाजूला काढून ठेवणं. ही बचतीची व्याख्या ऐकायला किती सोपी वाटते ना; पण ही साधीशी गोष्ट जर आपल्या आयुष्यात यशस्वीपणे घडवून आणायची असेल तर त्यासाठी आपल्याला वचनबध्दच व्हायला लागतं. डोक्यात खर्चाच्या आधीही बचतीचंच प्लॅनिंग ठेवायला लागतं. आधी बचत आणि नंतर खर्च असं सूत्र जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात पाळलं तरच कागदावरची बचत प्रत्यक्षात उतरते. खरंतर बचत हिच तुमच्या उत्तम आर्थिक नियोजनाची पहिली पायरी असते.
बचत करावी..
– आपल्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी
– मालमत्ता निर्माण करण्यासाठी
– आर्थिक सुरक्षितता व स्थैर्यासाठी
आधी सुरूवात
बचत तर करायची आहे, पण करायलाच जमत नाही, अशी तक्रार करणारे आणि बचतीचा सोप्पा मंत्र मागणारेही खूप असतात. माझ्या मते ‘आधी सुरूवात’ हाच बचतीचा मंत्र आहे. तुम्ही यापूर्वी कोणत्याही प्रकारे बचत केलेली नसेल तरी काही बिघडत नाही. जे यापूर्वी कधीच केलं नाही ते आज आणि आता करा. म्हणजे बचतीबाबत उद्यापासून बघू, करू असं धोरण न ठेवता बचतीची सुरुवात आज आणि आत्ता करा. इंग्रजीत ‘टाइम इज मनी’ म्हटलं जातं ते उगाच नाही. लक्षात घ्या, आयुष्यात तुम्ही जेवढय़ा लवकर बचतीला सुरुवात कराल आणि तिची सवय लावून घ्याल तितक्याच तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या संधीही वाढतील!
खर्चनंतर.आधी बचत!
महिन्याच्या उत्पन्नातून काही पैसे खर्च झाल्यावर तुम्ही बचतीचा विचार केल्यास तुमची फारशी बचत होऊ शकणार नाही. बचत हाच तुमचा सर्वांत पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा खर्च असायला हवा. नियमित बचत करण्याचा हा सर्वांत खात्रीशीर मार्ग आहे. (तुमचा पगार झाल्यावर शक्य तितक्या लवकर त्यातून काही भाग बचतीसाठी बाजूला काढा. (सुमारे १0 टक्के)
तुमचे उत्पन्न कमी असले, तरी ही कटिबद्धता तुम्हाला उत्तम बचतीसाठी मदत करील. सुरुवातीला हे जरा अवघड वाटू शकेल; पण घरातील प्रत्येकाला अवलंब करता येण्यासारखी ही अगदी साधी सवय आहे.
बचतीची शिस्त व्हायला हवी.
बचत करायला सुरूवात तर केली पण ती भविष्यात कायम रहावी म्हणून अमूक-अमूक रक्कम दरमहिन्याच्या उत्पन्नातून बचत म्हणून रहायलाच हवी ही शिस्त आपली आपणच लावून घ्यायल हवी. तरच या बचतीचा सराव होतो आणि सरावाची सवय. यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सातत्य. घरातील प्रत्येक सदस्य ज्याच्या-त्याच्या पद्धतीनं बचतीची शिस्त नियमित पाळणार असेल, तर बचत आणि वेळोवेळी संपत्तीची निर्मिती हा आयुष्य घडविण्याचा हा एक चांगला मार्ग ठरतो.
तुमची बचत स्मार्ट आहे का?
तुम्ही म्हणाल, हो आम्ही बचत करतो. पण, माझ्या मते बचत करणं हे जितकं महत्त्वाचं तितकंच आपली बचत स्मार्ट असणंही महत्त्वाचं आहे.. स्मार्ट बचत हिच उत्तम बचत ठरू शकते. आता तुम्ही करता ती बचत ही स्मार्ट आहे का? हे ओळखणं फारसं अवघड नाही. त्यासाठी खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील इतकंच.
-भविष्यातील वापरासाठी तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा काही भाग नियमितपणे बाजूला काढता का?
हो की नाही
– तुमचे बचत खातं आहे का?
हो की नाही
– तुमची उद्दिष्टं, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तुम्ही कधी बचतीचा वापर करता का? केला आहे का?
हो की नाही
– आपत्कालीन प्रसंगासाठी तुम्ही कधी आधीच पैसे बाजूला काढण्याचा प्रयत्न केला का?
हो का नाही
– तुमचे एकूण उत्पन्न तुमच्या एकूण खर्चापेक्षा अधिक असते का?
हो की नाही
– तुम्ही तुमची बचत किंवा तिचा काही भाग अधिक परताव्यासाठी कोठे गुंतवला आहे का?
हो की नाही
उत्तम बचतीच्या गरजा समजावून घेण्यासाठीची ही एक प्रतिकात्मक प्रश्नावली आहे. वरीलपैकी बहुतांश प्रश्नांना तुमची उत्तरे ‘हो’ असतील, तर अभिनंदन.. कारण तुम्ही चांगल्या प्रकारे बचत करीत आहात, तुमची बचत ‘स्मार्ट’ आहे. हे असंच सुरू ठेवा. तुमची बहुतांश उत्तरं जर ‘नाही’ अशी असतील, तर तुम्हाला चांगली बचत करण्यासाठी बरंच काम करावं लागणार आहे.. या कामाला तुम्ही आज, आत्ता, या क्षणी सुरूवात करणार का?