गरजेला पुढय़ात घ्या, इच्छेला मागे बसवा!
गरजा.. या एका शब्दाभोवती आपलं सारं आयुष्य गुरफटलेलं असतं. हो ना? छोट्या-मोठय़ा वस्तूंची खरेदी असो, करिअर वा जोडीदाराची निवड असो. या प्रत्येक बाबतीत आपल्या गरजा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं;
पण आपल्या या खर्याखुर्या गरजा कशा ओळखायच्या?
वरवर पाहता, हा प्रश्न खूप साधा-सोपा वाटेल; पण आपल्या अस्सल गरजा ओळखणं ही उत्तम आर्थिक नियोजनाची आणि एकूणच चांगल्या आयुष्यासाठीची महत्त्वाची पात्रता असते.
नाही समजलं?
– एक उदाहरणच देते. हा एक प्रसंग. जो एखाद्या दुकानात, बर्थडे पार्टी किंवा घरात; कुठेही घडू शकतो. एका-दोन वर्षांच्या बाळानं चॉकलेटचा हट्ट धरला आहे. ‘मला चॉकलेट हवं’ म्हणत ते मूल मोठय़ानं रडतंय-भेकतंय. त्याच्या आईनं यापूर्वीच त्याला काही चॉकटलेट्स दिले होते; मात्र मुलाचं समाधान झालेलं नाही. त्याला आणखी चॉकलेटस् हवे आहेत. बिचारी आई त्याला नाना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करते आहे. प्रथम ती त्याला सांगते की, ‘चॉकलेटस् संपले.’ त्याचा उपयोग होत नाही. मग ती सांगते, ‘मी तुला उद्या आणखी चॉकलेटस् देईन.’ त्यावर मूल आणखी भोकाड पसरतं. आता मात्र आई त्याच्यावर रागावते. तरी परिणाम शून्य. उलट यामुळे त्या बाळाचा राग वाढतो आणि ते इवलंसं मूल घरातल्या वस्तू फेकू लागतं. एका चॉकलेटसाठी एवढं.?
आता त्या आईपुढे दोनच पर्याय शिल्लक राहतात. एकतर मुलाला हवं ते चॉकलेट देऊन टाकावं किंवा त्याला एक फटका मारून गप्प बसवावं. तेवढय़ात तिला कोणीतरी सांगतं, ‘अगं, बाळ थकलंय. त्याला जरा दुसरं काहीतरी खायला-प्यायला दे..’
अन् काय आश्चर्य! आईनं तसं केल्यावर एखादा चमत्कार घडल्यासारखं ते मूल रडायचं थांबतं! चॉकलेटबाबत विसरून जातं आणि आईनं दिलेला पदार्थ हसतमुखानं खाऊ लागतं.
यावर ती आई सुटकेचा नि:श्वास टाकते.
या एका प्रसंगातून त्या आईनं आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा धडा गिरवला. ‘आपल्या इच्छांपेक्षा गरजा वेगळ्या असू शकतात.’
इथे काय घडलं? ते मूल भुकेलं झालं होतं अन् त्याला काहीतरी खायला हवं होतं. नेमक्या त्याचवेळी त्याला चॉकलेट मिळाल्यानं बाळानं त्याचाच हट्ट धरला. कारण तेव्हा तेच त्याच्यासाठी खाद्य होतं.
इच्छा आणि गरजा यांत आपणही गफलत करतोच की.!
‘गरज’ की ‘इच्छा’?
जगण्यासाठी आपल्याला जे जे आवश्यक असतं, (उदा- अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम, सुरक्षितता) त्या सगळ्या आपल्या गरजा असतात.. याउलट ज्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, अशी अपेक्षा असते; पण ज्यांच्याशिवाय आपण जगू शकतो, त्या वस्तू नसल्या तरी फारसं बिघडत नाही, अशा गोष्टी म्हणजे आपल्या इच्छा. जसं की वरच्या प्रसंगातील त्या मुलासाठीचं ते चॉकलेट होतं!
पण ही साधी गोष्ट मुलंच नव्हे, त्यांचे आई-बाबा आणि वयानं प्रौढ, समजदार असलेली माणसंही समजून घेऊ शकत नाहीत. जीवनात आपल्या गरजा आणि इच्छा यांच्यातला फरक अनेकांना समजून घेता येत नाही. त्यामुळेच अनेक आर्थिक अडचणी उद्भवतात.
‘चॉकलेट’चा क्षण
आजवरच्या आयुष्यात ‘चॉकलेट हवं’ असा तुमच्यासाठी कोणता क्षण होता?
आपल्या इच्छा-अपेक्षांचा प्रकर्षानं विचार करताना आपल्या खर्या गरजा कधी विसरलात? त्यांच्याकडे कधी दुर्लक्ष केलं?
अगदी लहानशा गोष्टीपासून सुरुवात करा. काय करा, यावेळी किराणा मालाची खरेदी करून घरी आल्यावर नक्की काय आणलं, हे तपासा. त्यात किती वस्तूंची आपल्याला खरोखर गरज होती आणि किती गोष्टींची नुसती इच्छा, हे पाहा.
यात आणखी एक तिसरा प्रकारही असू शकतो, वाया जाणार्या वस्तूंचा. एखादी वस्तू घेताना चांगली वाटली; पण आता आपल्याला वाटतंय, ‘अरे, या वस्तूची आपल्याला गरजही नव्हती आणि ती घेण्याची इच्छाही.’ आता एखादी अशी वस्तू आठवा, जिची खरोखर गरज होती; पण तरीही आपण ती विकत घेतली नाही.
आता पुढची पायरी. ज्या ज्या वेळी आपण खरेदीची यादी तयार कराल, तेव्हा त्यात आधीच्या गरजांचा समावेश करा, मगच इच्छांची यादी लिहा.
‘इच्छे’ला कसं आवरायचं?
गरज नसताना एखादी वस्तू घ्यावीशी वाटली तर त्यासाठी एक फॉम्र्युला आहे. अशा वेळी स्वत:ला दोन प्रश्न विचारायचे.
१) मी या वस्तूशिवाय राहू शकेन का?
२) ही वस्तू मला पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी एवढीच आवडेल का?
– पहिल्या प्रश्नाचं उत्तर ‘हो’आणि दुसर्या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असेल, तर ती वस्तू मुळीच खरेदी करू नका!
– आहे की नाही सोप्पं!.