गोष्ट राजा-राणीची!

Swapna Mirashi

राजऋषीनं राजा-राणीला सांगितलं, या झाडाच्या बिया राज्यात पेरा. त्या झाडांना जादुई फळं लागतील. ही फळं खाऊन राजपुत्र नंतर चक्रवर्ती राजा होईल, पण लक्षात ठेवा, झाडं वाढवणं इतकं सोपं नाही. त्याची फळं खूपच मधुर आहेत,  फळं खा, पण ती संपवायची नाहीत, नाहीतर तुमचं राज्यच खालसा होईल!.

————-

आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. राजा अन् राणीची! आपण सगळ्यांनी आजी-आजोबाच्या मांडीवर बसून कधी ना कधी गोष्ट ऐकलीच असेल.. तशीच छानशी गोष्ट ! तुम्ही म्हणाल, आर्थिक विषयावरच्या कॉलममध्ये गोष्ट? हो ! कारण ही गोष्ट आपल्याला बरंच काही शिकवून जाणारी आहे..

त्याआधी मला सांगा, यशाची गुरुकिल्ली काय? – आपल्या सभोवतालचे आर्थिक जग हे प्रचंड मोठे आणि गुंतागुंतीचे आहे. त्यातल्या संधी ओळखून त्यांचा योग्य वापर करणो ही सध्याच्या बदलत्या जगातील यशाची गुरुकिल्ली आहे. मान्य?

पण हे आजूबाजूचे आर्थिक वातावरण आणि मुख्य म्हणजे त्यातल्या संधी जाणून कशा घ्यायच्या? यासाठी मी सुचवेन, ‘स्टार्टिग फ्रॉम द स्टार्ट !’ आता सुरुवातीपासून म्हणजे कोठून? तर आपल्या वैयक्तिक अर्थकारणापासून. विचार करा, आपल्यापैकी किती व्यक्ती आपल्या वैयक्तिक वा खासगी अर्थकारणाचा पाया समजून घेतात? अनेक मोठय़ा, उच्चशिक्षित व्यक्तीसुद्धा स्वत:च्या रोजच्या व्यवहारातल्या आणि कामकाजातल्या आर्थिक बाबी समजावून सांगताना गोंधळतात. त्यांची स्थिती कशी असते सांगू? अनेक उच्चशिक्षित पालकही आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे, याबाबत संभ्रमात असतात ना, तशी! तुम्ही म्हणाल, अर्थकारण आणि मुलांचे संगोपन यांचा काय संबंध? पण एका विशिष्ट, संकल्पनात्मक पातळीवरून या दोन्ही बाबींकडे पाहिल्यास दोन्हींचे परस्परांशी अत्यंत रंजक, औत्सुक्यपूर्ण आणि ‘इंटरेस्टिंग’ नाते असल्याचे दिसून येईल! हाच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणो मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट तुमचे मनोरंजन तर करील; पण वैयक्तिक वा खासगी अर्थकारण आणि पालकांकडून होणारे मुलांचे संगोपन या दोहोंतील नातेही ती उलगडून दाखवेल. ही गोष्ट नव्याने पालक झालेल्या व्यक्तींना आपली वाटेल; शिवाय ज्यांना नातवंडे आहेत अशा वयस्क आजी-आजोबांनाही जवळची वाटेल.

ही गोष्ट आहे ‘पप्पा’ नावाच्या राजाची आणि त्याची राणी असलेल्या ‘मम्मी’ची. त्यांच्या आटपाट नगरात सर्वच व्यक्तींना ‘पालक’ म्हटले जाई. पप्पा आणि मम्मीच्या या राज्यात सगळीकडे छान आनंदाचे वातावरण असे. सर्वावर काही जबाबदा:या होत्या आणि सर्वाना संधीही होत्या. आपल्या या राजा-राणीला म्हणजे पप्पा आणि मम्मीला एक छोटासा राजपुत्र होता, त्याचे नाव ‘हनी.’

एकदा राजा-राणीकडे राजऋषी आले आणि त्यांनी राजपुत्रचे भविष्य सांगितले. ते म्हणाले, ‘हा राजपुत्र मोठा होऊन एक अत्यंत यशस्वी राजा होईल आणि सगळे जग त्याचा आदर करील.’ हे ऐकून राजा-राणीचे डोळे चमकले. कारण त्यांनाही नेमके तेच हवे  होते.

‘पण त्यासाठी तुम्हाला अत्यंत खडतर प्रयत्न करावे लागतील.’ राजऋषींनी पुस्ती जोडली. ‘हनी’ला तुमचे प्रेम, तुमचा वेळ आणि एका जादुई झाडाची फळे खायला द्यावी लागतील.

राजऋषींचे म्हणणो मम्मी आणि पप्पा अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होते. ऋषी म्हणाले, ‘या जादुई झाडाच्या बिया तुम्हाला अत्यंत दूरवरून आणाव्या लागतील. तेथे जाण्याचा मार्ग बराच लांब, खडतर आणि आव्हानांनी भरलेला आहे; पण तुम्ही जर योग्य पद्धतीने चाललात, तर हा रस्ता आनंदमयही असू शकतो. राजऋषींचे बोलणो ऐकून राजा आणि राणी त्या जादुई झाडाच्या बिया आणण्याच्या मोहिमेवर निघाले. महत्प्रयासाने ते त्याठिकाणी पोहचले. तेथून बिया घेतल्या आणि राज्यात परतले.

‘खूप छान ! आता या बिया तुमच्या राज्यात पेरा.. या बियांपासून उगवणा:या झाडाला जादुई फळे लागतील.. ही फळे तुमच्या आणि हनीच्या विकासाची काळजी घेईल.’ – राजऋषींनी भविष्य वर्तवले.

पुढे राजऋषी म्हणाले, ‘पण एक गोष्ट लक्षात ठेवा. या झाडाची फळे खूप चवदार असतात. ती मर्यादित आणि ठरावीक मोसमातच येतात. आगामी काळासाठी तुम्हाला ही फळे साठवून ठेवावी लागतील. राजपुत्रने वारंवार या फळांची मागणी केली, तर कठीण होऊन जाईल. जशी तुम्ही तुमच्या हनीची काळजी घेता, तशी या फळरूपी पैशांची (मनीची) काळजी घ्या. हनी आणि ‘मनी’ला एकत्रितरीत्या वाढू द्या आणि एकमेकांचे मित्र होऊ द्या’, असे म्हणत राजऋषींनी राजपुत्र (हनी) आणि पैसारूपी फळाला (मनी) एकत्रित उत्तमरीत्या वाढवण्याचे पाच मंत्र राजा-राणीला दिले आणि ते निघून गेले.

काय आहेत हे पाच मंत्र? – वाचा पुढच्या अंकात!.

Comments