चुकांवर फुली

Swapna Mirashi

आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना हा रोजच्या बातम्यांचा विषय व्हावा इतक्या वाढल्या आहेत. ‘अमुक ठिकाणी आर्थिक घोटाळा, गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक..’ अशा बातम्या वर्तमानपत्रातून, वृत्तवाहिन्यांवर नेहमीच वाचायला-ऐकायला मिळतात. आपल्या आजूबाजूला हे प्रकार आता नेहमी घडत आहेत. संबंधित ग्राहक किंवा आर्थिक सेवा घेणार्‍या, आर्थिक व्यवहार करणार्‍या व्यक्ती जेंव्हा आपल्या हक्क आणि जबाबदार्‍यांबाबत सजग आणि  जागरूक नसतात, तेव्हा अशा घटना हमखास घडतात. त्यामुळे पैशांच्या क्षेत्रात कोणतंही पाऊल उचलताना आपण खबरदारी बाळगायला हवी. त्यातूनच संभाव्य धोका वा नुकसान टळू शकते.. पण हे साधायचं कसं हाच मुख्य प्रश्न आहे. पण डोन्ट वरी,  या प्रश्नाला उत्तर आहे.

भविष्यातले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची ही झटपट यादी खास तुमच्यासाठी.. हे ‘डूज अँण्ड डोन्टस्’ व्यवस्थित सांभाळले, तर तुम्ही अगदी सेफ राहू शकता!

हे  ‘डूज्..’ करायलाच हवेत

१) तुम्ही स्वीकारत असलेल्या चलनी नोटांचा खरेपणा वा विश्‍वासार्हतेची न संकोचता खात्री करून घ्या.

२) रक्कम योग्य असल्याची खात्री झाल्या नंतरच संबंधित बॅँक वा दुकानाच्या कॅशिअरचे काउंटर सोडा.

३) बचत करीत असाल, पैसे गुंतवत असाल वा कर्ज काढत असाल, तेव्हा प्रत्येक व्यवहार आपल्या हिशोबाच्या अचूक आणि खर्‍या नोंदींच्या आधारेच करा. आपल्या या सगळ्या नोंदी रिझर्व्ह बॅँकेच्या नियमांना अनुसरून असतील, याची काळजी घ्या.

४) आपले पैसे कोठेही गुंतवण्यापूर्वी त्या आर्थिक योजना वा सेवेच्या अटी-शर्ती पूर्णत: समजावून घ्या.

५) तुम्हाला काही शंका असेल तर तिचे समाधान करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला मनमोकळेपणानं प्रश्न विचारा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पैशांच्या गुंतवणुकीबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल पूर्णत: निश्‍चिंत असायला हवेत. अशीच गुंतवणूक खरंतर फलदायी ठरत असते.

६) बचत, गुंतवणूक, विमा, महागड्या वस्तूंची खरेदी, कर्जाचे हफ्ते यासंदर्भातील कागदपत्रं अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवा.

७)  एखाद्या संस्थेतील कोणा व्यक्तीनं तुमच्याशी आर्थिक गैरवर्तन केले किंवा तिच्याकडून चुकीची वागणूक मिळाली, तर ही बाब संबंधित बॅँकेचे अथवा संस्थेचे वरिष्ठ अधिकारी वा तक्रार निवारण विभागाच्या तत्काळ निदर्शनास आणून द्या.

८) गरज पडल्यास ग्राहक तक्रार निवारण मंच, आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घ्या.

हे ‘डोन्टस्.’ टाळायलाच हवेत

१) लॉटरी वा नोकरीसंदर्भातील आर्थिक घोटाळ्यात चुकूनही अडकू नका. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीही कोणतीही गोष्ट फुकट देत नाही वा देणारही नाही.

तुम्हाला देश-विदेशातून ई मेल, पत्र येऊ शकते, कोणी व्यक्ती तुम्हाला नोकरीचं आमिष दाखवू शकते किंवा अगदी कमी श्रमांत घरबसल्या भरपूर पैसे कमावण्याची लालूच दाखवू शकते. अशा वेळी या ऑफर्सच्या विश्‍वासार्हतेची पडताळणी करणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला एखाद्या ई मेल, पत्र वा फोनद्वारे लॉटरीचं बक्षीस लागल्याचं सांगण्यात आलं, तर त्याकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं. लक्षात घ्या,  ही प्रलोभनं वा आमिषं केवळ तुम्हाला भुलवण्यासाठी असतात. तुमची आर्थिक गाडी रुळावरून पूर्णत: घसरवून टाकण्याची आणि तुमची मन:शांती नष्ट करण्याची ताकद या प्रलोभनांमध्ये असते. त्यामुळे त्यांना दूरच ठेवा.

२) कोणत्याही नोकरीसाठी कधीच टेबलाखालून वगैरे पैसे देणं, लेखी व अधिकृत पुराव्याशिवाय कोठे डिपॉझिट भरणं हा आर्थिक व्यवहार निव्वळ गैर आहे. हे आर्थिक व्यवहार कटाक्षानं टाळायलाच हवेत.

३) तुमच्या बॅँकेचा खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्डचा पिन नंबर, क्रेडिट कार्डस् वा बॅँकेसंदर्भातील अन्य माहिती कोणाशीही शेअर करू नका. यामुळे ओळखीतून होणार्‍या फसवणुकीपासून आपण सहज वाचू शकतो.

४)  कष्टाचे पैसे जुगार वा लॉटरीच्या तिकिटांत गमावणं चुकच.  या गोष्टी म्हणजे निव्वळ पैशांचा अपव्यय आहे. लॉटरी वा जुगार हा योगायोगाचा खेळ आहे, ज्यात आपण जिंकूच ही खात्री नसते.  एखाद्या व्यक्तीला लॉटरीच्या तिकिटातून भरघोस पैसे मिळाल्याचे तुम्ही ऐकता आणि हुरळून जाता; मात्र त्यामागचं वास्तव असं असतं की, अशी जिंकणारी व्यक्ती ही तब्बल १, ५८, ९0, ७00* जणांपैकी एक असते! (हा आकडा लॉटरीच्या तिकिटावरील सर्व आकडे जुळण्याशी संबंधित आहे.)

५) कोणालाही आपल्या अगतिकतेचा फायदा घेऊ देऊ नका. तुम्ही एखाद्या आर्थिक घोटाळ्यात फसवले गेले असाल, तर ते एकट्यानं सहन करू नका. आपल्या कुटुंबाला विश्‍वासात घ्या आणि तत्काळ पोलीस किंवा ग्राहक न्यायालयात जाऊन दाद मागा.

Comments