कर्जाऊ घेतलेली, खूप इंधन खाणारी, खुटुखुटु चालणारी गाडी ‘चांगली’ कशी?
अमक्यानं शेअर्समध्ये पैसे गुंतवले, तमक्यानं बॉण्ड घेतले..कोणी अपघात विमा उतरवला वगैरे वाक्यं नेहमी आपल्या कानांवर पडतात. आधीच आर्थिक गुंतवणूक, शेअर मार्केट, म्युच्युअल फंडस् या क्लिष्ट, किचकट गोष्टींविषयी आपल्याला काहीच माहिती नसते.. त्यात अशा गोष्टी ऐकून आपल्याला खात्रीच पटते की, आपल्याला यातलं काही कळत नाही! पण असं काही समजण्याचं कारण नाही. तुम्हाला माहितीयं आपण आपली आर्थिक परिस्थिती एकदा नीट समजावून घेतली तर आपणही आपल्या पैशाचं चांगलं नियोजन करू शकतो.. आणि हे सगळं तेवढं कठीण नाहीए. पण त्यासाठी आपल्याला आधी आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे जाणून घ्यावं लागेल..
ते कसं करायचं?
आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याची आपल्याकडे फार ढोबळ पद्धत रूढ आहे. लग्नाची बोलणी होत असताना मुलाला एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे, ‘तुम्ही किती कमावता?’ एकेकाळी बहुतांश बॉलिवूड चित्रपटांतही हा डायलॉग असायचाच.. पण या प्रश्नाच्या उत्तरातून एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीचा खरोखर अंदाज लावता येतो? मला नाही वाटत. लक्षात ठेवा, नुसता उत्पन्नाचा आकडा त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीची परिपूर्ण माहिती देऊ शकत नाही. मग कशावरून लावायचा हा अंदाज? सोप्पं आहे.. कोणाचीही आर्थिक परिस्थिती पुढील चार अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असते. ते म्हणजे उत्पन्न, खर्च, मालमत्ता अन् कर्जे..
आता हे घटक जरा सविस्तर समजावून घेऊ या.
१) आपली कमाई अन् खर्च
दर महिन्याला तुम्ही किती पैसे कमावता आणि त्यातले किती खर्च करता, यावर तुमच्या हातात शिल्लक राहणार्या पैशाचे गणित अवलंबून असते. आणि हाच आकडा अत्यंत महत्त्वाचा असतो. दर महिन्याचा हा ‘बॅलन्स’ तुमच्या आर्थिक परिस्थितीचा निदर्शक असतो. तुमच्या आर्थिक नियोजनाचा आधारस्तंभच म्हणा ना! तुम्हाला मिळणार्या दर महिन्याच्या पगारातून किंवा व्यवसायाच्या उत्पन्नातून तुमच्या कुटुंबाचा दैनंदिन खर्च वजा केल्यावर जर भरभक्कम रक्कम शिल्लक राहत असेल, तर ही शिलकी रक्कम तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सूचित करते. याउलट बहुतांश महिन्यांत तोकडी वा शून्य बचत होत असेल तर तुमची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली असल्याचे समजा. तुम्ही घर वा विकत घेतलेल्या फ्लॅटचे हफ्ते भरत असाल, तर बचत कमी होणं एकवेळ गृहित धरता येईल; मात्र तसे नसल्यास ते आजारी आर्थिक परिस्थितीचंच चिन्हं मानायला हवं.
२) मालमत्ता आणि कर्ज
तुमची हक्काची मालमत्ता ही तुमच्या सध्याच्या आणि भविष्यातल्या आर्थिक स्थितीचा आरसा असते. सोन्या-चांदीतली गुंतवणूक असो, बॅँकांमधील मुदत ठेवी, शेअर्स, म्युचुअल फंड वा जमीन-जुमल्यात गुंतवलेली रक्कम.. ही गुंतवणूक एकतर तुमच्या उत्पन्नात भर टाकत असते किंवा तुमचे खर्च तरी कमी करीत असते. उदा. तुम्ही राहण्यासाठी घर विकत घेतलं तर तुमच्या घरभाड्याचा खर्च आपोआपच वाचतो. मालमत्तेतली गुंतवणूक तुमची आर्थिक परिस्थिती बळकट करीत असते. याउलट कर्ज वा जबाबदार्या तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करीत असतात.. कर्ज ही एखाद्या जुन्या गाडीसारखी असतात, जी भरपूर इंधन पितात; त्या तुलनेत धावत मात्र अजिबात नाही!
कशी आहे आपली परिस्थिती?
१) तुम्ही व तुमचं कुटुंब विविध स्रोतांतून दर महिन्याला एकूण किती आर्थिक उत्पन्न कमावतं? हे ठरवा.
२) कुटुंबाला महिन्याला एकूण किती खर्च लागतो? हे नोंदवून ठेवा.
३) तुमच्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च यांच्यात कितीचा फरक आहे?
४) तुमच्या कुटुंबाच्या मालमत्तेची यादी करा. याशिवाय गृहकर्ज वा अन्य कर्ज असल्यास त्यांचीही नोंद घ्या.
आता लक्षात घ्या, दर महिन्याच्या एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा केल्यावर मोठी रक्कम शिल्लक राहत असेल आणि मालमत्तेच्या तुलनेत कमी कर्ज वा देणी अशी स्थिती असेल, तर तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, असं समजायला हरकत नाही!