पैसा. येतो कुठून, जातो कुठे?

Swapna Mirashi

‘बजेट’ म्हटलं अनेक गोष्टी आपल्याला आपोआप आठवतात. एखादी महागडी वस्तू घ्यायची असली किंवा अनपेक्षित खर्च आला की लगेच आपल्या ‘बजेट’ची मांडणी करायला लागतो. फेब्रुवारी महिन्यात तर सगळीकडेच ‘बजेट’वर चर्चा झडू लागतात. देशाचे अर्थमंत्री दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी ‘बजेट’ म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात.

काय असते हे बजेट? ते कशासाठी सादर करतात? तर पुढच्या वर्षी सरकारकडे पैसा कोठून येणार आणि सरकार त्याच्या वापराचे नियोजन कसे करणार, याचे विेषण अर्थमंत्रालय या बजेटच्या माध्यमातून आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करीत असते. केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या मूलभूत गरजा (उदा : अन्नधान्य, पाणी, संरक्षण, शिक्षण, दळणवळण, संदेशवहन, आरोग्यसुविधा आदि.) आणि अन्य गरजांची (उदा : सुशोभिकरण, यांत्रिकीकरण आदि.) नोंद घेतली जाते.  लक्षात घ्या, संपूर्ण देशासाठी जे काम अर्थमंत्रालय करते, एखाद्या कंपनीसाठी जे काम तिचा अर्थ विभाग करतो, तेच आणि तसेच काम तुम्ही घरगुती पातळीवरही करू शकता आणि आपल्या आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करू शकता..

हे काम म्हणजे आपले स्वत:चे ‘बजेट’ तयार करणे! तुम्ही म्हणाल, बजेट किंवा अर्थसंकल्प तयार करणे हे किचकट काम असते.. आपण कसे करणार? आपण तर अकाउंटचा अभ्यासही केलेला नाही वगैरे वगैरे.. डोन्ट वरी! तुम्हालाही तुमचे बजेट तयार करता येऊ शकते! ते कसे बनवायचे, हेच आपण पाहणार आहोत..

 

बजेट म्हणजे काय?

अगदी सोप्या शब्दांत सांगू? ‘बजेट’ म्हणजे तुमच्या पैशाचे उत्तम नियोजन करणारा सर्वसाधारण आराखडा; पण बजेट म्हणजे फक्त एवढेच नाही. बजेट ही एक बांधिलकी असते. तुमच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणारे ते अत्यंत महत्त्वाचे साधन असते.

 

बजेटचा फायदा प्रत्येकाला!

तुम्ही दरमहा हजार, दहा हजार वा लाख रुपये कमावत असा, बजेट हे प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी मदतच करीत असते. तुम्ही आर्थिक प्रवासात नेमके कोठे चालले आहात आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्ही कसे जायला हवे, याचे दिशादर्शन बजेट करीत असते.

उत्तम, कौशल्यपूर्ण बजेट हे तुम्ही कोठे भरमसाट वा गरजेपेक्षा अधिक पैसे खर्च करीत आहात, हे दाखवून देण्यास मदत करते. जेणेकरून तुम्ही काही खर्च घटवू शकता, गुंतवणुकीत वाढ करू शकता, मालमत्ता विकत घेऊ शकता आणि या सर्वांतून आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकता. आर्थिक स्थिती आणि उत्पन्न कितीही असो, बजेट हे प्रत्येकाची मदत करते.

 

बजेटसंबंधी थोडक्यात..

– घरगुती बजेट वा अर्थसंकल्प तयार करणे अजिबात अवघड नाही. त्यासाठी प्रामाणिक आणि शिस्तबद्ध प्रयत्न मात्र हवेत.

– अर्थसंकल्पामागचा उद्देश निश्‍चित हवा. जसे की,

– तुमचा मासिक खर्च व शिल्लक जाणूनघेण्यासाठी.

– वाया जाणारे, गरज नसलेले खर्च कमी करण्यासाठी.

– गुंतवणूक वाढवण्यासाठी.

– बजेटची प्रक्रिया साधी-सोपी असायला हवी.

– तयार केलेल्या बजेटचा तुम्ही दर महिन्याला आढावा घ्यायला हवा.

– तुमचे बजेट कोलमडवणार्‍या बाबींना सामोरं जाण्याची तयारी ठेवायला हवी. (अशा बाबी बर्‍याच असतात आणि त्या नेहमी उद्भवतात.) अचानक आलेले खर्च तुमचं बजेट विस्कळीत करू शकतात.

 

सांभाळा

– अनपेक्षित खर्च, नियोजनात नसलेले दुरुस्ती किंवा सुधारणेवरील खर्च, गृहीत न धरलेला प्रवास, पै- पाहुणे, कौटुंबिक समारंभ, अपघात, नोकरी जाणे

Comments