छान टेरेस असलेला, किचन ट्रॉलीज, सोफा, पडदे, फर्निचरने सजलेला फ्लॅट, इंग्लिश मीडिअम शाळेत मुलांचे शिक्षण, आठवड्यातून एकदा (तरी) मॉलमध्ये मनसोक्त शॉपिंग, वर्षातून दोनदा निसर्गरम्य स्थळांची भटकंती अशी लाइफस्टाइल जगण्याचं सध्या प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यासाठी रात्रीचा दिवस करून कामाला जुंपून घेतलं जातं.. एक स्वप्न पूर्ण झालं, की दुसर्याच्या मागे सुसाट वेगाने धाव घेतली जाते.. थोडक्यात, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. पण ते कसं व्हायचं? काही ‘ट्रिक्स’ आहेत का त्यामागे? ‘थ्री इडियटस्’मध्ये एक डॉयलॉग आहे, त्यातला रॅँचो म्हणतो, ‘कामयाब नहीं, काबील बनो, कामियाबी तुम्हारे पिछे आयेगी..’ श्रीमंतीच्या स्वप्नाचंही असंच काहीसं आहे.
‘पैसा’ या विषयावर आपण आयुष्यातला किती वेळ खर्च करतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय? मग तो पैसा कमावण्यासाठी असेल वा खर्च करण्यासाठी! पैसा कसा कमवायचा अन् कसा खर्च करायचा, याचा विचार (की काळजी?) करण्यात आपला कितीतरी वेळ जात असतो..
आपलं अवघं आयुष्यच पैशाने व्यापलेलं आहे. आयुष्यभर उदरनिर्वाह करू शकू, एवढा पैसा कसा कमावता येईल, याचा विचार आपण तरुण वयात सुरू करतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नाच्या तयारीला लागतो, तेव्हा तर पैसे कमावण्याच्या विचारानं आपल्याला झपाटून टाकलेलं असतं. लग्न झाल्यावर जोडीदाराची जबाबदारी वाढते, त्याचबरोबर पैशांची भूक अन् चिंताही..आर्थिक स्थिती जराशी स्थिरस्थावर झाल्यावर आपल्याला वेध लागतात ते मुलांच्या शिक्षणाचे. आपल्या मुलांची आर्थिक स्थिती आपल्यापेक्षा चांगलीच असायला हवी, असा आपला आग्रह असतो. कोणत्याही गोष्टीसाठी मन मारण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, त्यासाठी त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, म्हणजे त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, अशी सगळ्याच आई-बाबांची भावना असते. त्यासाठी मग इतकी वर्षे मध्यम वेगाने चालणार्या आयुष्याच्या गाडीचे ‘गिअर्स’ बदलावे लागतात, पैशांच्या कमाईचा स्पीड वाढवावा लागतो ! अक्षरश: धावतच सुटावं लागतं !
नुसतं वाचून हबकलात ! हो ना? प्रत्यक्ष जीवनात हे सारं यापेक्षा कितीतरी पटीने अवघड आहे. आज बहुतांश पुरुष आणि महिलांना प्रत्यक्ष अन्नापेक्षा औषधं अन् शक्तिवर्धकं अधिक का खावी लागताहेत? आजारी पडल्यावर किंवा थेट हॉस्पिटलात दाखल झाल्यानंतरच (म्हणजे अगदी सक्तीचे झाल्यावरच) माणसांना विश्रांती घेणं शक्य होतं, असं का?
कारण फक्त पैसा! आपली स्वप्नं, इच्छा-आकांक्षाच्या पूर्तीसाठी आवश्यक असतो तो पैसा अन् त्यासाठी चालते अविश्रांत धावपळ.. माणसाच्या आयुष्याला व्यापून टाकणारं अर्थचक्र म्हणूनच जिवघेणं झालं आहे. ते आपण टाळू शकतो का? आपल्या गरजेएवढा पैसा आपण कमावू शकू; पण त्यासाठी जिवाची एवढी घालमेलही व्हायला नको.. असं होईल?
– येस्स, हे शक्य आहे!
पैशांची नुसती काळजी करण्याऐवजी जरा ‘विचार’ केला तर? चला, तर मग त्यासाठी आपण पुढील काही गोष्टींवर लक्ष देऊ या..
’ आपल्या गरजा आणि इच्छा.
’ व्यवहारांची व्यवस्थित नोंद.
’ आपल्या आर्थिक परिस्थितीचं आकलन.
’ भविष्यातल्या जमा-खर्चाचं अंदाजपत्रक.
’ त्यानुसार पैशांचं नियोजन.
’ मुख्य म्हणजे, पैशाचे व्यवस्थापन..
पुढच्या टप्प्यांत आपण त्याविषयीच अधिक चर्चा करू या.