‘खड्डे’

Swapna Mirashi

हौसेनं आपण एखाद्या प्रवासाला निघतो, रस्त्यातला एखादा खड्डा, ट्रॅफिक जाममुळे अख्ख्या प्रवासाचा विचका होऊ शकतो. आपल्या आर्थिक नियोजनाचंही असंच असतं. एखादा छोटा खड्डाही

नियोजनाची ऐशी की तैशी करून टाकतो!

 

समजा तुम्ही कारनं प्रवास करता आहात. वाटेत एखादा छोट्यासा खड्डा आडवा आला  किंवा एखादं अवघड वळण लागलं तर ..

म्हटलं, तर ही अगदी छोटी गोष्ट, पण त्यामुळे तुमचं प्रवासाचं अख्खं नियोजन चुकू शकतं, आपल्याला जिथे पोहोचायचं असतं तिथे उशीर होवू शकतो.

हे असं एकदा-दोनदा नाहीतर अनेकदा घडतं. पण आपण काय करतो?

झालेल्या गैरसोयीबद्दल फक्त मनस्ताप.

पण समजा कारमध्ये बसण्याआधीच या सर्व शक्यता गृहीत धरून आपण नीट नियोजन करू शकलो तर?.

आर्थिक नियोजनाचंही अगदी असंच असतं. आर्थिक बाबीततले छोटे-मोठे गैरसमज वा अवलंबली जाणारी चुकीची पद्धत तुमच्या पैशांचं नियोजन डळमळीत करू शकते.

आपल्याकडच्या येणार्‍या, जाणार्‍या पैशांचा  प्रवास सुकर होण्यासाठी आज जरा या प्रवासातल्या काही खाचखळग्यांविषयी जाणून घेऊ या..  आधी आपण आपल्याकडून पैशांबाबत कायम होणार्‍या काही चुकांवर नजर टाकू.

 

कुठे चुकतो आपण?

  1. गरज नसतांनाही खर्च

बर्‍याचदा दुकानात जाईपर्यंत आपल्याला काय घ्यायचंय किंवा आपल्याला काय हवंय हेच ठरलेलं नसतं. मग विचार न करता पैसे खर्च केला जातात. अर्थात, एकूण खर्चाच्या तुलनेत याचं प्रमाण फार मोठं नसतं. म्हणजे आलोय बाहेर म्हणून चाट, सामोशावर ताव मारला जातो, हॉटेलिंग केलं जातं, सिनेमा पाहिला जातो.  गरज नसताना मोबाईल बदलला जातो. नियोजन न करता खर्च करण्याच्या या सवयीनं हळू हळू आपलं आर्थिक नियोजन कसं कोलमडलं हे आपल्यालाही कळत नाही.

  1. ¬ण काढून सण

खिशातलं क्रेडिट कार्ड हे आपल्या सोयीसाठी असतं, गैरसोयीसाठी नव्हे. क्रेडिट कार्डचा अधिकाधिक वापर म्हणजे कर्ज घेऊन पैसे खर्च करणं. क्रेडिट कार्ड हा पैसे जवळ बाळगण्याचा सुलभ पर्याय असला, तरी या पैशांवर दोन आकडी व्याज आकारलं जातं. क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेले पैसे वेळेवर न भरल्यास नंतरचा आकडा आपण आधी खर्च केलेल्या पैशांपेक्षा कितीतरी फुगलेला असू शकतो.

3 आधी खर्च करू, बचतीचं नंतर बघू

आपत्कालीन परिस्थितीसाठी तरतूद किंवा गुंतवणूक म्हणून नियमित बचत केली जात असली, तरी हा संपत्ती वाढवण्याचा उत्तम मार्ग असतो. तथापि, अनेक जण बचतीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. बचतीचा परतावा नाममात्र असला, तरी त्याचा विचार न करता नियमित बचतीद्वारे रक्कम बाजूला टाकत राहणे आर्थिक प्रगतीसाठी अत्यावश्यक असते.

४. त्याचा फायदा झाला तर आपलाही होईलच !

 

आर्थिक धोका पत्करण्याची आपली क्षमता, आपल्या गरजा, प्राधान्यक्रम आणि आर्थिक उद्दिष्टांवर आपल्या गुंतवणुकीचे निर्णय आधारलेले असायला हवेत. य बाबी व्यक्तीनिहाय वेगळ्या असतात. एखादं गुंतवणूक धोरण एखाद्याला  फायदेशीर ठरलं म्हणून तसाच फायदा आपल्यालाही होईल असं मानणं योग्य नाही. बरेच जण अर्धवट ज्ञानावर वा दुसर्‍याचं पाहून गुंतवणूक करतात. गुंतवणुकीची आपली क्षमता आणि उपलब्ध पर्याय यांची योग्य सांगड गुंतवणूक करताना घालायला हवी.

 

दोन समज, दोन वास्तव

आर्थिक बाबतीत काही समज आपल्या मनात वर्षानुवर्षे रुतून बसतात. त्यांच्यामुळेही नुकसान होऊ शकतं.

* समज क्रमांक 1  आपण आता चांगले पैसे कमावतोय म्हणजे नवृत्तीच्या वेळी किंवा वृद्धावस्थेतही आपल्याकडे पुरेसे पैसे असतील.

वास्तव क्रमांक 1 : नवृत्तीच्या वेळी आपल्याकडे पुरेसे पैसे असावेत, असं वाटत असेल तर त्यासाठी आधीपासूनच नियोजन करावं लागतं. तुम्ही सध्या किती कमी वा अधिक कमावता, हे महत्त्वाचं नाही. कित्येक कोट्यधीश माणसं वार्धक्यात कंगाल झाल्याची अन् आधी साधारण उत्पन्न असणारी माणसं नंतर गडगंज श्रीमंत झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

 

* समज क्रमांक 2 :  आपले करनियोजन वर्षाच्या सुरुवातीला केले काय किंवा ‘मार्च एण्ड’च्या काही दिवस आधी केले काय, काहीही फरक पडत नाही..

* वास्तव क्रमांक 2 : कायदेशीरदृष्ट्या हे बरोबर आहे; पण आर्थिक दृष्टिकोनातून करनियोजन वर्षाच्या सुरुवातीला करणंच योग्य असतं. असं केल्यानं एकतर सुनियोजितरीत्या काही कर वाचवता येतो. दुसरं म्हणजे, तुम्ही काही चांगल्या गुंतवणूकसंधी साधू शकता.. वर्षाच्या सुरुवातीला करनियोजन केल्यानं तुम्हाला तुमच्यासमोर तुमच्या आर्थिक बाबींचा आरसाच धरता येतो. याउलट कर वाचवण्यासाठी वर्षाच्या शेवटी घाईघाईनं वा अविचारानं पैसे गुंतवल्यानं फायद्याऐवजी नुकसानचं पदरात पडू शकतं. पध्दतशीर करनियोजनामुळे वर्षाअखेरची धावपळ टळून नियोजनबद्ध गुंतवणूक करणं  आणि त्यातून हवा तसा फायदा मिळवणं शक्य होतं.

Comments