पैशाला बरकत

Swapna Mirashi

सुरक्षितता, आरोग्य, पोषण, स्वातंत्र्य ही चार महत्वाचे मंत्र आपण समजून घेतले. आता पंचसूत्रीतला पाचवा मंत्र किंवा सूत्र म्हणा! ते आहे शिक्षण!

आपलं मुल गुणी आहेच, पण त्याला उत्तम शिक्षण मिळावं असा विचार आपण करतोच ना! त्यासाठी त्याला शाळेत घालतो, संस्कारवर्गाला पाठवतो, त्याला वेगवेगळी स्किल्स शिकवतो.

हेच आपल्या पैशांबाबतही करायला हवं.

पैशाचं नियोजन कसं करायचं हे एखाद्या उत्तम आर्थिक सल्लागाराच्या सल्लयाने करायला हवं.  पैसा वाचवायचा म्हणजे फक्त बचत नव्हे तर गुंतवणूकही. चलनवाढ, महागाई, पगारवाढ, करनियोजन, ऐनवेळेसचे खर्च यासगळ्यात आपला पैसा कसा वाढेल यासाठी आपल्या पैशाला योग्य शिकवरी लावायला हवी. मात्र ज्या कुणाचा आपण सल्ला घेणार ते आर्थिक सल्लागार तटस्थ आहेत ना, याची खात्री करुन घ्यायला हवी. एखादी बॅँक किंवा आर्थिक संस्थेचा नफा वाढवण्यासाठी ते तुम्हाला काही सल्ले देत नाहीत ना, हे तपासून पहा! अनेकदा काही सल्लागार गुंतवणूकीचे जे सल्ले देतात, त्यापाठी त्यांचं काही साटंलोटंही असतं!

जसं मुल शाळेत घातलं की आपली जबाबदारी संपत नाही, त्याचं शिक्षण आपल्याला शाळेबाहेरच अधिक जागरुकतेनं करावं लागतं, तसंच आपल्या पैशासंदर्भातही आपलं ज्ञान वाढवायला पाहिजे. रिझर्व्ह बॅँक, सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) यांसारख्या अनेक महत्त्वाच्या नियामक संस्था आणि ‘मनीलाइफ फाउंडेशन’सारख्या सामाजिक संस्था अर्थविषयक प्रशिक्षण शिबिरं, कार्यशाळा घेत असतात. त्यांच्या वेबसाईटवर विविध माहिती उपलब्ध असते.  ती माहिती वाचून, पैशासंदर्भात विविध गुंतवणूकीचे उपाय समजून घेऊन, जाणकारांचा सल्ला घेऊन, आपण स्वयंशिक्षण करणं केव्हाही उत्तम.

शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट. कोणतीही आर्थिक सेवा, उत्पादन किंवा एखाद्या योजनेचा ग्राहक म्हणून तुम्ही प्रश्न विचारायला शिका. कुणावरही पैशाच्या बाबतीत विश्‍वास ठेवू नका. कंपनी कितीही मोठी असो, माणूस कितीही भला असो, पैसे देताना विश्‍वास ठेवू नका, प्रश्न विचारा आणि खात्री करुन मगच गुंतवणूक करा!

या पंचसूत्रीचा वापर केला तर आपली लेकरंबाळंही सुखी होतील आणि आपल्या पैशाला बरकत येईल!

ती बरकत यावी म्हणून तर हे पाच सूत्रांचं व्रत आपण अंगी बाणवायला हवं!

 

 

Comments