हनी आणि मनी

Swapna Mirashi

आठवतं, मागच्या लेखात मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होते. पप्पा अन् मम्मी असलेल्या राजा-राणीची आणि त्यांच्या लाडक्या राजपुत्राची म्हणजे हनीची. त्या गोष्टीत राजऋषी हे राजा-राणीला सांगतात की, स्वत:चं अपत्य आणि स्वत:चे पैसे वाढवणं या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. म्हणूनच हनी (राजपुत्र) आणि मनी (पैसे) एकत्रित अन् उत्तमरीत्या कसे वाढवायचे, याविषयी ते पाच मंत्रही देतात.. आठवलं?

आज आपण त्याच अपूर्ण राहिलेल्या गोष्टीपासून सुरुवात करू या..

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, राजऋषींनी राजा-राणीला नेमके कोणते इतके महत्त्वाचे मंत्र दिले?  त्यातलाच एक मंत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे.

 

डोक्यावर सुरक्षित छत्री धरा.

तुमच्या मुलाला म्हणजे राजपुत्राला (हनी) आणि ‘मनी’ला (पैशांना) त्यांचे वर्तमान आणि भविष्य अत्यंत सुरक्षित, निर्धोक असल्याबद्दल खात्री पटवून द्या. वाटू द्या त्याला की, आपल्या आईबाबांसोबत आपण सुरक्षित आहोत..

तुमच्या लाडक्या हनीला जाणवू द्या की, ‘तुझी काळजी घ्यायला मी खंबीर आहे आणि सदैव, हवा तेथे तुझ्याबरोबर आहे. तू अजिबात काळजी करू नकोस’. आता यातल्या ‘हवा तेथे’चा अर्थ अडथळ्यांच्या वाटेवर चालताना, मार्गातले अपघात, अपयश पचवताना प्रत्येक क्षणी मी तुझ्याबरोबर आहे, असा आहे. ‘मूल्य आणि नैतिकतेच्या वाटेवर चालताना तुझं प्रत्येक पाऊल भक्कम आणि आत्मविश्‍वासानं ओतप्रोत असू दे.. मनात कसलाही किंतू ठेवू नकोस. पालक, मित्र आणि गुरू असा ‘ऑल इन वन’ म्हणून मी कायम तुझ्याबरोबर राहणार आहे, ही जाणीवही त्याला करून द्या.

लक्षात ठेवा, तुमचं हे आश्‍वासन प्रत्येक टप्प्यावर ‘हनी’तील आत्मविश्‍वास वाढवेलच, शिवाय आव्हानं स्वीकारायला त्याला आणखी खंबीर करेल.

आता जे हनीला सांगितलं ते मनीलाही सांगायला हवं. म्हणजे काय, तर तुमच्या पैशालाही सांगायचं की, ‘वर्तमान आणि भविष्यातल्या सगळ्या अडी-अडचणींसाठी मी एक उपाय योजून ठेवला आहे. विमा काढून ठेवलाय..’ अपघात, संकटं वा आपत्कालीन परिस्थितीत तुमचं पैशांचं झाड कोसळणार नाही. त्याचा सतत वाढत राहण्याचा आत्मविश्‍वास टिकून राहील. खरं म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी विमा काढायला हवा!

मला सांगा, तुम्ही पावसाळ्यात पावसापासून संरक्षण करण्यासाठी काय करता? तुम्ही म्हणाल, ‘हा काय प्रश्न झाला? याचं साधं-सोपं उत्तर आहे आम्ही छत्री किंवा रेनकोट वापरतो!’

विमासुद्धा या छत्रीसारखाच तर असतो किंवा  छत्रीसारखं काम करतो. संभाव्य नुकसान लक्षात घेऊन विमा काढायचा असतो.

पण समजा, पाऊस पडण्याचा ठरावीक काळ (पावसाळा) नसेल तर? पाऊस वर्षभर कोसळणार असेल तर? पाऊस पडणं पूर्णत: अनपेक्षित, अनिश्‍चित असल्यास काय कराल तुम्ही?

यावर दोन उपाय आहेत. एक तर तुम्ही वर्षभर छत्री जवळ बाळगू शकता किंवा जेव्हा पाऊस येईल तेव्हा ती दुकानातून विकत घेऊ शकता.

पैशांबाबतही अगदी अस्संच आहे. संभाव्य नुकसान, संकटापासून रक्षण करण्यासाठी तुम्ही वर्षभर पैसे जवळ बाळगू शकता. हा तुमचा आपत्कालीन निधी. या निधीमुळे तुमच्या बचत खात्यात नेहमी ठरावीक रक्कम शिल्लक राहील. पुढच्या किमान तीन महिन्यांचा तुमचा दैनंदिन खर्च भागू शकेल एवढी ही रक्कम असायला हवी.

दुसरा उपाय आहे विम्याचा. जेव्हा संभाव्य नुकसान व संकटाची तीव्रता मोठी असते, तेव्हा विमा पॉलिसी संस्था वा विमा कंपनीकडून विमा काढून घ्या. विमा कंपनी ही तुमच्या संभाव्य धोक्याची जबाबदारी वाटून घेते. त्याच्या बदल्यात ती तुमच्याकडून  विम्याचा हप्ता घेते.

तुम्ही अशा साध्या-सोप्या पद्धतीनं विमा काढून गरज असेल तेव्हा भरपाई मिळवू  शकता.  तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर, तुमचे संभाव्य धोके टाळण्याचा वा ते इतरांकडे (विमा कंपनीकडे) हस्तांतरित करण्याचा विमा हा एक उत्तम मार्ग आहे.

नेहमी लक्षात ठेवा, पैशांचं उत्तम नियमन, स्थिरतेसाठी बचत खाते आणि विमा हे तुमच्या आर्थिक गाडीचे ‘शॉक अँबजॉर्बर्स’ आहेत. त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

Comments