घरचं बजेट

Swapna Mirashi

बजेट. ते भलेही घरखर्चाचं का असेना, पण ते व्यवस्थित आखलं तर आपल्याला कशी आर्थिक शिस्त लागते आणि बजेट कसं प्रत्येकाची मदत करतं हे आपण मागील लेखात पाहिलं. बजेट हे आपल्या आर्थिक व्यवहारात महत्त्वाचं तर आहेच पण ते तेव्हाच उपयोगी पडतं जेव्हा ते नीट आखलं जातं. आपलं उत्पन्न हे किती का असेना पण ते आखण्याचे काही विशिष्ट टप्पे आहेत ते आधी समजून घ्यायलाच हवे.

 

बजेट आणि पाच टप्पे

’ उत्पन्न व खर्चाचा हिशेब रोजच्या रोज ठेवा

>  दर महिन्याला हिशेब करून शिल्लक तपासा.

>  त्यासाठी आधी जमा व खर्चाच्या रकमांची बेरीज करा.

>  आता शिल्लक रक्कम काढा. त्यासाठी जमा व खर्च रकमेतील फरक शोधा. ही फरकाची रक्कम म्हणजेच शिल्लक.

>  शिल्लक रक्कम शून्य वा त्यापेक्षा कमी असल्यास, तुमचे वाढीव खर्च शोधून ते निश्‍चित करा. हे खर्च कमी करणं हे तुमच्या बजेटचं पहिलं उद्दिष्ट.

>  खर्चाची वेगवेगळ्या गटांत वर्गवारी करा. उदा : किराणा वा अन्नधान्य, प्रवास, वेगवेगळ्या प्रकारच्या फी वगैरे. यामुळे दर महिन्याला या खर्चांचा माग काढणं सोपं जातं.

 

’ बजेटचा उद्देश निश्‍चित करा

’ तुम्हाला मिळणार्‍या उत्पन्नाची विशिष्ट प्रमाणात विभागणी करा

तुम्ही दरमहा कमवित असलेल्या पैशाचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्याची विभागणी करणं हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. मिळालेल्या पैशातून खर्च, बचत, स्थैर्य आणि गुंतवणूक या बाबींचं प्रमाणशीर आगाऊ नियोजन करणं म्हणजे पैशांची विभागणी होय.

 

’ पैशांची विभागणी

आपल्या घरात येणार्‍या पैशाची विभागणी कशी करावी, याचा ढोबळ आराखडा पुढे दिला आहे. तुमच्या उत्पन्नाचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी या आराखड्याचा आवर्जून वापर करा. पुढे ही प्रक्रिया सतत करीत राहिल्यास या विभागणीचं सूत्र सहज लक्षात येईल. पैशांची विभागणी ही आपल्या आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त बाब आहे.

>  खर्च : घरखर्च भागवण्यासाठी साधारणत:

५0 टक्के उत्पन्न.

>  बचत : पुरेशी बचत निर्माण करण्यासाठी

२0 टक्के उत्पन्न.

>  आर्थिक स्थैर्य : आर्थिक स्थैर्य वा सुरक्षेसाठी

२0 टक्के उत्पन्न.

>  गुंतवणूक : गुंतवणुकीसाठी

१0 टक्के उत्पन्न.

 

’ अनुकरण आणि आढावा

यशस्वी बजेटिंग प्रक्रिया ही नियोजनाच्या अंमलबजावणीतील शिस्तीवर अवलंबून असते. तुमच्या बजेटचे दरमहा अत्यंत प्रामाणिकपणे अनुकरण करीत राहा. त्याची स्वत:ला सवयच लावून घ्या. आपल्या कामगिरी व प्रगतीचा सतत आढावा घेत राहा.

 

जादूची छडी

आपण आखलेल्या बजेटची अंमलबजावणी होणं गरजेची आहे. ही अंमलबजावणी जर प्रभावीपणे करायची असेल तर त्यासाठी एक मस्त आयडिया सांगते, ती करून बघाच. ही आयडिया म्हणजे बजेटिंगसाठी लिफाफ्यांचा वापर करावा. हे लिफाफे आपल्या आर्थिक नियोजनातलं  महत्त्वाचं साधन ठरू शकतात.  बजेटच्या अनुकरणासाठी हा एक साधा, पण प्रभावी मार्ग आहे. बजेटची नीट अंमलबजावणी न करू शकणार्‍यांसाठी तर ही युक्ती म्हणजे जणू जादूची छडीच आहे.

यासाठी फार काही करावं लागत नाही. अगदी सोप्पं आहे हे. आपल्या घरात असणारे कोणतेही साधे कागदी लिफाफे तुम्ही यासाठी वापरू शकता. एवढेच नव्हे, झिप लॉक असलेल्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा जुना फोटो अल्बम वापरण्यासही हरकत नाही.

 

लिफाफ्यांची आयडिया

>  तुमच्या खर्चाची प्रमाणशीर विभागणी होण्यासाठी प्रत्येक खर्चाच्या गटाचा स्वतंत्र लिफाफा तयार करा.

>  त्या लिफाफ्यावर संबंधित खर्चाच्या गटाचं नाव टाका.

>  प्रत्यक्ष खर्चाच्या वेळी त्या-त्या लिफाफ्यातूनच पैसे काढून द्या.

>  तुमच्या ऐच्छिक खरेदीच्या वेळी तुमच्याकडे त्यासाठी पुरेसा पैसा आहे की नाही, हे तपासून पाहा तसं असेल तरच खरेदी करा. तसं नसेल तर खरेदी करू नका. किमान खर्चाची पुढची विभागणी होईपर्यंत तरी खरेदीवर वचक ठेवा.

>  तुम्ही एखाद्या महिन्यात एखाद्या लिफाफ्यातील रक्कम खर्च केली नाही, तर पुढच्या महिन्यात तुम्हाला त्या खर्चासाठी वाढीव पैसे उपलब्ध होतील. उपलब्ध झालेल्या या वाढीव पैशांचंही व्यवस्थित नियोजन करा.

हे सर्व जर स्टेप बाय स्टेप नीट केलं तर आपलं बजेट फक्त कागदावर राहणार नाही.

Comments