येता-जाता नको त्या गोष्टींवर पैसे उधळणारे, आणि मुलं म्हणतील ते घेऊन देणारे आईबाबा,
त्यांना आर्थिक वळण कसं लावणार?
———————
तुम्ही तुमच्या मुलांसोबत रस्त्यानं चालला आहात आणि मुलांनी चालता चालता दुकानातली एखादी वस्तू मागितली, तर तुमची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही ती वस्तू त्यांना घेऊन देता, स्पष्ट नकार देता, की आणखी काही?
आपल्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगवेगळं असलं, तरी जेव्हा पालकत्व आणि पैशांचा विषय येतो, तेव्हा बहुतांश पालकांची विभागणी त्यांच्या आर्थिक वर्तणुकीच्या आधारावर अगदी मोजक्या गटांत करता येते. वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर मुलांवर पैसे खर्च करण्याबाबत पालकांचा दृष्टिकोन ठरावीक प्रकारचा असतो. एकतर आई-बाबा मुलांच्या प्रत्येक मागणीला होकार देत राहतात, नाहीतर फक्त नाही नाहीच म्हणत राहतात.
दिवसातून कितीतरी वेळा आई-बाबा आणि मुलांच्या संवादात पैसे किंवा वस्तूंचा संदर्भ येत असतो. कधी मुलं एखाद्या वस्तूची नुसतीच मागणी करतात, तर कधी हट्टाला पेटतात. असा अनुभव आई-बाबा म्हणून आपण रोजच घेत असतो. पण मग अशा वेळेस आई-बाबा म्हणून आपण काय करतो?
मुलांना हव्या असलेल्या वस्तू- जसे पुस्तकं, खेळणी, सीडी या वस्तू मागताक्षणी विकत घेऊन देतो, की लेटेस्ट गॅजेट घेऊन देण्याच्या त्यांच्या मागण्या स्पष्टपणो नाकारतो?
मुलांना पैशांप्रती त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतो, की त्यांना त्यांच्या बेजबाबदार आर्थिक वर्तनावरून फक्त बोलतच राहतो?
आपण मुलांना पैशांचा काळजीपूर्वक वापर करण्यास प्रवृत्त करतो, की पैसे देऊन मोकळे होतो?
मुलांना त्यांच्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी हवे तेवढे पैसे पुरवतो, की मर्यादित पॉकेटमनी देऊन त्यांना पैसे व त्यांच्या गरजांची सांगड घालायला शिकवतो?
– या प्रश्नांचा जरा जाणीवपूर्वक विचार केला तर मुलांच्या आर्थिक भविष्याला, त्यांच्या वृत्तीला आपण आकार देतो आहोत, की त्यांना बेफाम सोडतो आहोत याचं उत्तर आपलं आपल्यालाच सहज मिळेल.
आई-बाबांच्या स्वत:च्या आर्थिक सवयी आणि वृत्ती मोठय़ा प्रमाणात मुलांमध्ये संक्रमित होत असतात. आई-वडील जसे वागतात, तशाच सवयी मुलांनाही लागतात. पैशांच्या वापराबद्दलही हाच नियम लागू पडतो. पैशांबाबतच्या आई-बाबांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय आणि कृती या गोष्टी मुलांची आर्थिक वर्तणूक आणि वृत्तीमध्ये आयुष्यभर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.
म्हणूनच मुलांना शिकवण्याआधी आपल्याच आर्थिक सवयी मोठय़ांनी तपासून घ्यायला हव्यात. मुलांच्या कोणत्या हट्टांना होकार द्यायचा आणि कोणते हट्ट नाकारायचे याबाबतचा प्रतिसाद आई-बाबांनी मनात पक्का करून ठेवायला हवा आणि त्याप्रमाणो त्यांनी वागायलाही हवं. तर पुढे जाऊन पैसे हे उधळायची गोष्ट नसून ते जपून वापरायचे असतात ही जबाबदारीची जाणीव मुलांमध्ये निर्माण होऊ शकते !
तुम्ही कशात मोडता?
आर्थिक प्रतिसाद आणि वर्तणुकीच्या आधारावर पालकांचे तीन गटांत वर्गीकरण करता येते.
1) काहीही मागा-देणारच!
मुलं कशाची मागणी करीत आहेत, याच्याशी काहीही कर्तव्य न ठेवता मुलांनी मागताक्षणी त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणारे किंवा तसा प्रयत्न करणारे पालक या गटात मोडतात.
2) आत्ता नाही-नाही म्हणजे नाही!
या गटातले पालक म्हणजे, मुलांनी कधीही, काहीही मागितले तरी त्यांचं एकच उत्तर ठरलेलं असतं, ‘नाही’ किंवा ‘आता नाही!’
3) विचार कर; मग माग!
आपण जी मागणी करतो आहोत, त्या वस्तूची खरोखर आपल्याला गरज आहे का, असा विचार करण्याची सवय आपल्या मुलांना लावणारे पालक या गटात मोडतात. असे पालक आपल्या मुलांना संबंधित वस्तू आपल्या बजेटमध्ये कशी बसवता येईल, असा विचार करायलाही शिकवतात.
तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारात मोडता?