पैशाच्या मानगुटीवरचा बोजा

Swapna Mirashi

पैसा येतो, पण त्याला ‘जायच्या’ वाटा दाखवतात आपली कर्ज आणि देणेकर्‍यांचे तगादे.

हनी आणि मनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, ती जोखीम कशी निभवायची हे आपण मागच्या लेखात समजून घेतलंच. पण नुस्तं आरोग्य उत्तम असून कसं चालेल? त्या दोघांनी मस्त वाढावं, फुलावं म्हणून थोडं मोकळं आकाशही हवंच. त्या मोकळ्या अवकाशात नवं काही शोधण्यासाठी सर्जनशीलतेनं मनसोक्त बागडूही द्यायला हवं. म्हणजेच त्यांना ‘स्वातंत्र्य’ द्यायला हवं. ऐकायला-वाचायला  हे सारं खूप सोपं वाटत असलं तरी  ते कृतीत उतरवणं तेवढं साधं-सरळ नाही!

‘हनी’वर  प्रेम करणं, त्याला हवा तेवढा वेळ देणं हे एकवेळ मान्य; पण त्याला या वयात स्वातंत्र्य द्यायचं, म्हणजे अतीच काहीतरी; अशानं पोरगं हाताबाहेर गेलं तर? अशी धास्ती वाटणं साहजिक आहे, पण त्याला स्वतंत्र जगू दिलं नाही तर कसं कळेल की आपण आजवर जी तत्त्वं-मूल्यं रुजवण्याचा प्रयत्न केला, ती खरंच त्याच्यात मूळ धरू शकली आहेत की नाही? फारतर काय तर तो चुकला किंवा त्याला गरज असेल तेव्हा त्याला आधार द्यायला आपण असू असा विश्‍वास त्याला देता यायला हवा. आणि आधार म्हणजे तो मागेल तेव्हा मदत, सतत मदतीच्या कुबड्या नाहीत.

असं केलं तरच तो  स्वत:चं आयुष्य कसं जगायचं हे स्वत: ठरवत, ते फुलवण्याचा प्रयत्न करेल. मात्र सतत स्वत:च्या दामटीला बांधलं, त्याच्यावर अपेक्षांचं ओझं ठेवलं, सतत हे कर-ते कर म्हणत त्याच्या मनावर दडपणाचे डोंगर उतरवून ठेवले, तर ते पोर गुदमरणारच!

हा नियम आपण हनीला म्हणजेच आपल्या मुलाला जसा लावणार, तोच नियम आपल्या ‘मनी’लाही लागू होतो. आपल्या पैशाच्या मानगुटावर सतत ‘देणी’ नावाचे डोंगर असतील तर, पैसा मोठा कसा होणार?

‘देणी’ म्हणजे काय?

कर्ज ( लोन),  पत ( क्रेडिट) आणि देणी (डेब्ट) हे तीन वेगवेगळे शब्द असं वरकरणी वाटतं, पण या तिन्ही गोष्टी प्रत्यक्षात सारख्याच.

‘कर्ज’ काढणं कुणाला चुकलंय. आपल्याला काही कारणासाठी मोठी रक्कम हवी असते. मग बॅँकेत जाऊन कर्ज काढावं लागतं.  ठरावीक वेळेत व्याजासह परतफेडही करावी लागते. म्हणजे आपण कमावलेल्या पैशाला ही वाट आधीच फुटलेली असते.

‘पत’ हा बॅँकेनं आपल्या परतफेडीच्या क्षमतेवर दाखवलेला विश्‍वास असतो. यामध्ये तुमची बॅँक तुम्हाला कर्ज मंजूर करायचं का आणि किती करायचं हे ठरवते. आता तर हीच पत पाहून क्रेडिट कार्ड दिली जातात. क्रेडिटवर वापरलेले पैसेही तुम्हाला  व्याजासह परत करावे लागतात.

आपण अशी देणी पैशाच्या मानगुटावर ठेवतो आणि मग वाढीस लागण्याऐवजी आपला पैसा त्या देण्यांपोटी खर्च होतो, तो होऊ नये असं वाटत असेल तर ‘देणी’ कमी करणं, पैशावरचा बोजा कमी करणं हेच आपण तातडीनं करायला हवं.

Comments