रोज फक्त 1 रुपया!

Swapna Mirashi

थोडीशी बचत ना? त्यात काय एवढं? जमेल की सहज!’ असं बचतीला नुकत्याच सुरुवात केलेल्या कोणाच्याही तोंडून निघालेलं एक सहज वाक्य.

बचतीचा निर्धार करताना सुरुवातीला असंच सोप्पं-सोप्पं आणि सहज वाटतं.  पण प्रत्यक्ष बचत करताना मात्र तारेवरची कसरत करावी लागते.  दिवसेंदिवस वाढती महागाई आणि जबाबदार्‍या पाहता अनेकांसाठी  बचत ही खरोखर अवघड गोष्ट झाली आहे. बचत न होण्याची कारणं कितीही असली, तरी घरातील प्रत्येकानं  बचत करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही बचत किती करता हे महत्त्वाचं नाही. ती कदाचित अधिक असू शकते, किंवा जेमतेमही. पण आपण ठरवलेली बचत नित्यानं, सातत्यानं, सवय म्हणून, शिस्त म्हणून करणं हे गरजेचं. एकदा का तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येकानं नियमित बचत सुरू केली की, तुम्हाला आपोआप समजेल, प्रत्येकाची छोटीशी बचतही किती महत्त्वाची आणि उपयुक्त ठरू शकते ते!

 

तीन पायर्‍यांची शिस्त

तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलंय  की, बचत मोठी असो की लहान, तिच्यातील शिस्त फार महत्त्वाची असते. कशी असावी ही शिस्त? त्यासाठी घरातल्या घरात बचत सुरू करण्याच्या काही साध्या-सोप्या पायर्‍या मी तुम्हाला सांगते. त्या टप्प्याटप्प्यानं अंमलात आणल्यास आपल्यापैकी कोणीही ‘स्मार्ट’ बचत करू शकतं.

>  पैसे जमा करण्याचा प्लॅस्टिक वा काचेचा एक गल्ला घ्या. तुम्ही कमावत असलेल्या प्रत्येक दहा रुपयांपैकी एक रुपया या गल्ल्यात टाका.

>  ही बचत अगदी न चुकता, नियमित करीत राहा. तुमचं उत्पन्न वाढलं, तर बचतीची रक्कमही वाढवत राहा.

>  रोजच्या व्यवहारातूनही बचत करीत राहा आणि ती गल्ल्यात टाकत राहा.

 

खर्चावर टाच

घरात होणार्‍या अनावश्यक खर्चांना कात्री लावा. खर्च जपून करण्यासाठी आग्रही राहा..

* तंबाखू, सिगारेट यांसारख्या वाईट सवयी सोडून द्या. कुटुंबातील इतरांनाही त्या सोडायला लावा. या सवयी तुमच्या आरोग्यासाठी तर हानीकारक असतातच; पण तुमचे पैसेही मोठय़ा प्रमाणात खातात.

* कमी महत्त्वाच्या वस्तूंवरील खर्चावर निर्बंध आणा. उदा. गरजेपेक्षा अधिक कपडे, नेलपॉलिश, मोबाइल, बॅगा-पर्सेस,  गृहसजावटीचं साहित्य,  महागडे दागिने, कॅण्ड्ीज किंवा चॉकलेट्स. या वस्तू किंवा गोष्टींसाठी असा पैसा खर्च होतो, जो तुमच्या स्थैर्य, सुरक्षिततेसाठी बचत केला जाऊ शकतो वा गुंतवला जाऊ शकतो.

* मुलांवरील अनावश्यक खर्चावरही टाच आणा.

उदा.  केवळ मुलांना खूश करावं म्हणून एकामागोमाग खेळणी घेत सुटणं, येता जाता हातात महागडी चॉकलेट्स ठेवणं यामुळे मुलं खरंच मनापासून खूश होतात की नाही हा संशोधनाचा विषय, पण यामुळे वायफळ खर्चाला मात्र खूप जागा मिळते. मुलांना निव्वळ आनंदीच करायचं ना, तर पैसे खर्च करून आनंद विकत घेण्यापेक्षा मुलांचे मन त्यांच्या छंदांत रमवा. कला, कागदकाम, क्रीडा, संगीत  या गोष्टी त्यांच्या खर्‍याखुर्‍या विकासासाठी मदत करतील, आणि तुम्हाला बचतीसाठीही!

 

अडचणीत धावून  येणारी बचत

आपल्या कुटुंबाचा एका महिन्याचा संपूर्ण घरखर्च भागू शकेल, एवढी रक्कम आपल्या बचत खात्यात नेहमी शिल्लक ठेवावी. बचतीद्वारे  एकदा तुम्ही ही आपत्कालीन निधीची रक्कम जमा केली की, ठरवलेली उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी बचत सुरू करा.

Comments