‘लक्ष्मी’पूजन!

Swapna Mirashi

अवघा भारत अपूर्व उत्साहानं दिवाळीचा सण साजरा करतो आहे. आज ‘लक्ष्मीपूजन’ म्हणजे या  सणातला महत्त्वाचा दिवस. माता लक्ष्मी म्हणजे संपत्ती अन् समृद्धीची देवता. दिवाळीमुळे चकाचक झालेल्या आणि उत्साहाचं उधाण आलेल्या घरांनी आता छान फुलांचे दागिने ल्यायले असतील. दारा-खिडक्यांत पणत्या पेटल्या असतील. रंगीबेरंगी, कल्पक रांगोळ्यांनी नटून अंगण छान हसत असेल. नवे कपडे,  हिर्‍या-सोन्याचे दागिने लेवून, घराची दारं सताड उघडी ठेवून सारे जण लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी आतुर झाले असतील.

पण या सगळ्या झगमगाटात दोन क्षण थांबण्याची गरज आहे असं नाही वाटत तुम्हाला? या सगळ्या धावपळीत आज तरी जरा चिंतन करूया का?

‘पण कसलं?’

– असा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला.

चिंतन-मनन करायचं ते आपल्याकडल्या लक्ष्मीचं.

आपली संपत्ती चिरंतन टिकावी, अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी का होईना, घरात येणार्‍या ‘लक्ष्मी’चा (पैसा) जरा विचार करूया..

तुम्ही तुमच्या घरात कोणत्या प्रकारे पैसा आणता? तो कसा येतो? तुम्ही तो कोठून मिळवता? तुमच्याकडे पैसा आल्यावर तो टिकतो की अल्पायुषी ठरतो?

हा पैसा तुमच्या कुटुंबात आनंद अन् समाधान पेरतो

की ताणतणाव आणि दबाव आणतो?

लक्षात घ्या, आपलं आर्थिक (आणि एकूणच) स्वास्थ्य हे आपल्या कमाईतून येणार्‍या पैशावर अवलंबून असतं. तुम्ही जे काम, उद्योगधंदा, नोकरी करता त्याच्या मोबदल्यात म्हणून हा पैसा तुमच्या खिशात, बॅँकेत वा घरात दाखल होत असतो. पण ही कमाई तुम्ही कशी करता, यावरही बरंच काही अवलंबून असतं. कामात तुम्ही प्रामाणिकपणा, सद्हेतू ठेवत असाल, तर हा पैसा नियमितपणे येत राहतो आणि तो आपल्याकडे मालमत्तेच्या रूपानं दीर्घकाळ मुक्काम करतो.

हे एक अगदी साधंसोपं तत्त्वज्ञान आहे. ते नीट लक्षात घेतलं तर आपल्याला हवं असलेलं आर्थिक स्वातंत्र्य, नियोजन आणि संपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टं आपण सहज साध्य करू शकतो. हाच मूलभूत विचार आपल्या पुराणातील स्त्री सूक्तात उत्तम रीतीनं मांडण्यात आला आहे. माता लक्ष्मीचा सन्मान राखण्याची शिकवण त्यातले श्लोक देतात. म्हणूनच आज या श्लोकांचं विशेष महत्त्व आहे.

चला तर मग, आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या मंगलदिनी आपल्याकडे येणार्‍या लक्ष्मीला (पैसा) जरा पडताळून पाहूया. तिचं मूल्यमापन करूया.. ही लक्ष्मी स्त्री सूक्तात वर्णन केलेले निकष पूर्ण करते की नाही, याविषयी जरा विचार करू..आणि तसं होत नसेल तर तशी परिस्थिती येण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना करूया..

आपले आर्थिक स्वास्थ्य नेमकं कसं आहे? याचं मूूल्यमापन करण्यासाठी स्त्री सूक्तातील दोन अत्यंत महत्त्वाचे निकष लावता येतील.

 

१) अनपगामिनी (सोडून न जाणारी)

जी कधी नष्ट करणं शक्य होणार नाही. आपल्याला सोडून जाणार नाही, आपल्यापासून दूर जाणार नाही  अशी लक्ष्मी. आपल्या आधुनिक अर्थशास्त्रात या निकषाला म्हणतात, आपल्या संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्यासाठी कायमस्वरूपी संपत्तीची निर्मिती.

श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाभिधाच्छोभमानं महीयते।

धान्य धनं पशु बहु पुत्रलाभम सत्संवत्सर दीर्घमायु: ।।

दीर्घायुष्य, आरोग्य, धनधान्य, कुटुंबीय हीदेखील आपली प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आर्थिक संपत्तीच असून ती अत्यंत मूल्यवान आहे. जरा विचार करा,  नुसते पैशांमागे धावण्यासाठी मी प्रचंड कष्ट करते/ करतो आहे का?

कायमस्वरूपी संपत्ती निर्माण करण्याचा मी विचार करतेय/ करतोय की नाही?

२)  न क्रोधो न च मात्सर्यं

न लोभो नाशुभामति:।

तुम्ही राग, लोभ, क्रोध, मत्सर या अवगुणांपासून दूर राहावं.  कारण तुमचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य हे तुमच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर अवलंबून असतं.

 

आता स्वत:ला विचारा

  • पैसे कमावण्याच्या नादात मी माझी शांत झोप, आरोग्य गमावले आहे का?
  • मी चिडचिडा, शीघ्रकोपी, तणावग्रस्त झालेय/ झालोय का?
  • कसल्या तरी दबावाखाली जगतेय/ जगतोय का?
  • आर्थिकदृष्ट्या चांगली स्थिती असूनही आपल्यापेक्षा उत्तम आर्थिक परिस्थिती असणार्‍याबद्दल मला मत्सर वाटतो का?
  • सध्यापेक्षा आणखी पैसा कमावण्याच्या विचारानं मी नेहमी अस्वस्थ असते/ असतो का?
  • आणि विचार करा.

हे श्लोक म्हणजे लक्ष्मीपूजन करतांना केवळ पुटपुटायचे श्लोक नसून हे श्लोक आपल्याला काहीतरी सांगत असतात.

त्यामुळे नीट लक्ष देवून ऐका की, या श्लोकांना नेमकं काय सांगायचंय?

हे श्लोक सांगतात..

दिवसरात्र निव्वळ पैशांमागे ऊर फुटेस्तोवर न धावतासुद्धा तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य मिळवू शकता. फक्त त्यासाठी तुमची पैसे कमावण्याची वृत्ती आणि पद्धत प्रामाणिक हवी. आपल्या पुराणात माता लक्ष्मी ही कायम भगवान विष्णूच्या सोबत असते, असा उल्लेख असतो. विवेकदृष्टी, समतोल आणि अलिप्तपणा हे भगवान विष्णूचे गुण आहेत. ते कधी माता लक्ष्मीच्या मागे धावताना दिसत नाही; पण तरी लक्ष्मी कायम त्यांच्यासोबतच असते.. असे का?

या उदाहरणावरून आलं काही लक्षात?

तुम्हीही या विवेकाच्या मार्गावर चालण्यास सुरुवात करायला हवी.  कारण हाच मार्ग तुमच्या फायद्याचा आहे.  आणि अर्थातच, त्यासाठी हा स्तंभ तुम्हाला मदत करीलच!

Comments