‘खिशातली’ सुपर पॉवर!

Swapna Mirashi

‘सुपरमॅन’ इतकी अचाट कामं कशी काय करू शकतो? – कारण त्याची अद्वितीय शक्ती! आपल्या प्रत्येकाकडेच अशी शक्ती असते. त्यावरच तर ठरतं, सारं काही!

———

‘सुपरमॅन’.. तुम्ही अनेकदा हा शब्द ऐकला, वाचला असेल..

‘सुपरमॅन’ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं?

अद्भुत शक्ती असलेलं एक काल्पनिक पात्र.. हॉलिवूड चित्रपटांत दिसणारं आणि विशिष्ट पोषाख परिधान केलेलं..

हा ‘सुपरमॅन’ सर्वाना भावतो-आवडतो.  सर्वसामान्यांमध्ये ‘सुपरमॅन’विषयी प्रचंड आदराची भावना असते.. विचार करा, या सुपरमॅनमध्ये असं काय असतं,  ज्यामुळे लोक त्याच्यावर एवढं प्रेम करतात?

ही गोष्ट म्हणजे त्याच्यातील ‘सुपरपॉवर’चा त्यानं इतरांच्या मदतीसाठी केलेला वापर ! कोणी संकटात असताना त्याचं ते वा:याच्या वेगानं मदतीसाठी धावून जाणं..

कल्पना करा, ज्या ‘सुपरमॅन’वर आपण एवढं प्रेम करतो, त्या ‘सुपरमॅन’नं आपल्या अद्भुत शक्तीद्वारे – म्हणजे ‘सुपरपॉवर’द्वारे कोणाला मदतच केली नाही तर?

या सुपरमॅननं आपल्या जादुई शक्तीचा वापर फक्त त्याच्या एकटय़ाच्या भल्यासाठीच केला तर आपल्याला तो तेवढाच आवडेल?

मला वाटतं, नाही !

– आपण सामान्य माणूस असलो, तरी आपल्या खिशातही एक ‘सुपरपॉवर’ असते, मग आपणही ‘सुपरमॅन’ होऊ शकतो का?

याचं उत्तर आपण आपल्या या विशेष शक्ती वा क्षमतांचा कसा वापर करतो, याच्यावर अवलंबून राहील.

आपण या शक्ती फक्त स्वत:च्या फायद्यासाठी वा स्वार्थासाठी वापरतो, की आपण त्या इतर गरजूंबरोबर वाटून घेतो?

तुम्ही म्हणाल, हे काय सांगताय? कोणत्या सुपरपॉवरबद्दल बोलतोय आज आपण? अन् असं कसं काय होऊ शकतो आपण सुपरमॅन?  थांबा, थोडं विस्तारानं याकडे पाहू या..

लक्षात घ्या, आपण हजारो, लाखो रुपये कमावले काय, की किरकोळ रक्कम मिळवली काय. पैसे अमूर्त असतात. हे पैसे जेव्हा आपण प्रत्यक्षात वापरतो तेव्हा ते मूर्त होतात. या पैशांचा वापर कसा करावा, हे ठरवणं आपल्या हातात असतं.

जगप्रसिद्ध अब्जाधीश ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स, प्रख्यात गुंतवणूकदार वॉरन बफे, ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी या सगळ्यांकडे जग किती आदरानं पाहतं, हे तुम्हाला माहीत असेलच. हा आदर असतो त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे.

अशी ही परोपकाराची संधी फक्त याच लोकांना मिळते आणि आपल्याला नाही असं मात्र नाही. आपल्याला अनेकवेळा आपत्कालीन स्थितीत बचावकार्यासाठी वा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतनिधी देण्यासाठी आवाहन केलं जातं. किती प्रतिसाद देतो?

अनेक मोठमोठे व्यावसायिक नियमितपणो सामाजिक संस्थांना मदत करीत असतात. लेखक, कलावंत  त्यांची कला किंवा त्यांना मिळालेली रॉयल्टी सामाजिक कामासाठी दान करतात. आपण घेतलेलं जागतिक दर्जाचं शिक्षण या देशातल्या वंचितांर्पयत पोहोचवता यावं, यासाठी काही तरुणांनी परदेशातल्या लठ्ठ पगाराच्या नोक:या नाकारल्याची नुकतीच घडलेली घटना ऐकली, वाचली असेलच.

साध्या गृहिणीसुद्धा घरातील नोकराला किंवा कामवाल्या बाईला त्यांची वैद्यकीय बिलं किंवा त्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरून मदत करीत असतात.

एवढेच नव्हे, एखादा शेतकरी किंवा रोजावर काम करणारा कष्टकरी मजूरसुद्धा देवळातल्या दानपेटीत रुपया-दोन रुपयाचं नाणं टाकायला विसरत नाही. ‘दान-धर्म’ हा आपल्या भारतीय संस्कृतीतला एक अद्भुत संस्कार आहे..

शेतकरी शेतीच्या प्रत्येक मोसमात त्यानं उत्पादित केलेल्या पहिल्यावहिल्या पिकाचा काही भाग, व्यावसायिक त्याचा पहिलावहिला नफा, नोकरदार त्याचा पहिला पगार आणि गृहिणी सणासुदीत तयार केलेल्या पदार्थाचा पहिला घास   ईश्वराला समर्पित करतात. हे झालं देवाला देणं; पण आपण जे काही समाजातल्या गोरगरीब, गरजूंना देतो, तेसुद्धा देवालाच पोहोचतं, असं म्हटलं जातं.

आपण आपल्या कमाईतला काही वाटा असा समाजार्पयत पोहोचवतो.

आपल्या सगळ्यांच्या खिशात गरिबांना आनंद देणारा सुपरमॅन (पैसे) आहे; पण आपण त्याच्या विशेष शक्तीचा वापर समाजासाठी करतो का, हा खरा प्रश्न आहे. ही ‘सुपरपॉवर’ म्हणजे ‘देण्या’ची शक्ती. या गोष्टीवर विचार करा. स्वत:ला नीट तपासून पाहा. पुढच्या वेळची तुमची कमाई, पीक, पगार, नफा यापैकी जे काही तुम्ही मिळवत असाल, एवढंच नव्हे, तर अगदी भेटवस्तूसुद्धा.. त्यातला काही भाग कोणा गरजवंताला दिला तर. आणि हे सगळं केवळ त्या व्यक्तीला मदत करण्याच्या निखळ, प्रामाणिक उद्देशातून, त्या व्यक्तीकडून परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलं तर?.

वंचितांच्या मदतीसाठी निरनिराळ्या सामाजिक संस्था काम करीत असतात. त्यांच्या माध्यमातूनही आपण समाजातल्या गरजू लोकांना मदत करू शकतो. मदत ही फक्त पैशातूनच होते असं नाही. पैशासोबतच वेळेचीही मदत आपण करू शकतो. आपण आपला वेळ एखाद्या सत्कार्यासाठी देऊन मदत करू शकतो. वेळसुद्धा पैशाइतकाच मौल्यवान असतो.

मदतीसाठी म्हणून आपण आपल्या खिशातले पैसे जेव्हा काढू तेव्हा आपल्या खिशातल्या ‘सुपरपॉवर’चं अस्तित्व आपल्याला नक्की जाणवेल.

आपल्याला सुपरमॅन बनवणारी ही सुपरपॉवर तर एकदम आवडली; पण आता ही ‘पॉवर’ कशी जपायची किंवा वाढवायची, हा प्रश्नही तुम्हाला पडलाच असेल.

– तर उत्तर एकदम सोप्पं आहे. मदतीची हीच कृती वारंवार करून !

Comments