‘हनी’ आणि ‘मनी’ला सांभाळण्याचा मंत्र आपण मागच्याच लेखात समजून घेतला. आता ‘हनी’आणि ‘मनी’च्या आरोग्याचीही उत्तम काळजी घ्यायला हवी. त्यासाठी हे दोन मंत्र.
नियमित व्यायाम
‘हनी’ आणि ‘मनी’ नेहमी धडधाकट राहिले पाहिजे. त्यासाठी व्यायाम हवा. त्यामुळे दोघांकडूनही नियमित व्यायाम करवून घ्यायला हवा, तर त्यांची तब्येत बरी राहील. सर सलामत तो पगडी पचास हे सूत्र लक्षात ठेवलं, तर मुलाचं शरीर बलवान आणि मन सुदृढ हवं. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर विकासाचा समतोल साधायला हवा. या सगळ्यांची गुरुकिल्ली म्हणजे नियमित व्यायाम! खेळ, योगाभ्यास, ध्यानधारणा या सार्यांची आणि त्याची ओळख व्हायला हवी.
आता तुम्ही म्हणाल, हनीच्या वाढीसाठी व्यायाम ठीक आहे. कारण तो एक माणूस आहे. पण पैशांबाबत (मनीचं) काय? त्याच्याकडून व्यायाम करवून घ्यायचा म्हणजे काय?
उत्तर अगदी सोपं आहे!
तुमचे पैसे तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना नियमित बॅँकेकडे पळू द्यावं! हाच तुमच्या पैशांचा व्यायाम! नियमित बचतीद्वारे पैशांचं पोषण सुरू होतं.
दर महिन्याला जास्तीत जास्त पैशांची बचत हे समजायला सोपं गणित.
डाएट प्लॅनिंग
तीच गोष्ट बॅलन्स डाएटची. सगळे पोषक घटक मिळाले तरच हनीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यासाठी मुलाच्या जिभेला वेगवेगळ्या चवींची ओळख व्हायला हवी. त्याच्या खाण्याच्या सवयींवरही लक्ष हवं आणि तो रोज उठून घराबाहेर जंक फूड तर खात नाही ना, याकडे लक्ष द्यायला हवं. त्यातूनही काही गंभीर आजार प्रतिबंधात्मक लसी आपण त्याला टोचतोच. लसीकरणाचं वेळापत्रक सांभाळणंही फार महत्त्वाचं.
तोच नियम पैशालाही लागू होतो. पैशांसाठीचा विषाणू कोणता? तर महागाई! म्हणून शक्यतो महागाईच्या काळात मोठय़ा वस्तू, खर्च टाळा. नियोजन करताना ‘पोर्टफोलिओ’ तयार करावा. रोख, शिल्लक, मालमत्ता अशा सगळ्या पोषक द्रव्यांचा त्यात समावेश करावा. यामुळे तुमच्या ‘मनी’चं आरोग्य चांगलं राहील आणि त्यात वाढही होत राहील. शारीरिक आरोग्याप्रमाणेच आर्थिक आरोग्याचीही नियमित तपासणी करीत राहा. अनावश्यक खर्च आणि देणी-येणी यांचा आढावा घेत राहा. कारण या गोष्टी तुमच्या ‘मनी’च्या आरोग्याचा आलेख झटकन खाली आणू शकतात.. सो, टेक केअर!
‘हनी’ आणि ‘मनी’च्या आरोग्यासंदर्भातले हे दोन्ही मंत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते आचरणात आणण्यासाठी तुम्हाला वेळ आणि लक्ष द्यावं लागेलच!